चीनमधील करोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि सप्तश्रृंगी निवासिनी या प्रमुख देवस्थानांनी मुखपट्टी बंधनकारक केली आहे. भाविकांना करोना त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.करोनाच्या पहिल्या लाटेत गर्दीवर नियंत्रणासाठी मंदिरे बंद करण्यात आली होती. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी राज्य सरकारच्या वतीने आवश्यक उपाय योजना करण्यात येत आहेत. सप्तश्रृंग गडावरील सप्तश्रृंगी निवासिनी ही उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी भाविकांची वर्षभर वर्दळ असते. केंद्र आणि राज्य शासनाच्या करोनाच्या संदर्भात करण्यात येत असल्याच्या आवाहनाच्या पाश्वभूमिवर करोनाचा संभाव्य प्रसार, संसर्ग टाळण्यासाठी मुखपट्टीचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. गर्दी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. कराेना काळात अवलंबलेले मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर आणि हात धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. देवस्थान आवारात तसे फलक लावण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांकडून गर्दीवर नियंत्रण आणत दोन जणांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात येत आहे. सप्तश्रृंगीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरात मुखपट्टीचा वापर बंधनकारक करण्यात आला असून संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्त दीपक पाटोदकर यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>नाशिक : निमाच्या विश्वस्तपदासाठी नव्या वर्षात मुलाखती; सात पदांसाठी ४० इच्छुक

त्र्यंबकेश्वर येथे ही नाताळच्या सुट्टीत भाविकांची होणारी संभाव्य गर्दी पाहता शनिवारपासून मंदिर परिसरात मुखपट्टीचा वापर बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना देवस्थानतर्फे मुखपट्टी वितरीत करण्यात आली. मंदिर परिसरात प्रवेश करतांना मुखपट्टीचा वापर करावा, लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानांकडून अशी काळजी घेण्यात येत असताना शहरातील इतर मंदिरांमध्ये मात्र नेहमीचेच चित्र आहे. कपालेश्वर, काळाराम मंदिर, सुंदर नारायण मंदिर, पंचवटीतील सीता गुंफा मंदिर यासह गोदाकाठावरील अन्य मंदिरांमध्ये देवस्थानच्या वतीने कुठलाही फलक, बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारच्या सूचना दिल्या जात नसल्याचे चित्र आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decision of trimbakeshwar saptashringi shrines to make face mask mandatory for devotees amy