लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : महापारेषण अंतर्गत भरती प्रक्रियेत कार्यकारी अभियंता आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) या पदांसाठी सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांचे गुण अंतिम निवड झाल्यावर जाहीर केले जातील, अशी माहिती कंपनीच्या मनुष्यबळ विभागाने दिली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने गतवर्षी अभियंत्यांच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली. यात कार्यकारी अभियंता २५ आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता १३३ पदांचाही समावेश होता. भरतीत काही पदांची गुणांसह निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. परंतु, कार्यकारी अभियंता आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदांच्या मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्यांच्या यादीत गुणांचा उल्लेख न केल्याने परीक्षार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले होते. लेखी परीक्षांच्या निकालात दुजाभाव झाल्याची परीक्षार्थींची तक्रार आहे. साशंकता दूर करण्यासाठी गुणांसह यादी जाहीर करण्याची मागणी सबऑर्डिनेट इंजिनिअर संघटनेने केली होती. या समस्येवर लोकसत्ताने प्रकाशझोत टाकल्यानंतर महापारेषणने परिपत्रक काढले आहे.
११ वर्षापूर्वीच्या भरती प्रक्रियेत असाच प्रकार घडला होता. तेव्हा गुण न दर्शविता निकाल जाहीर झाले होते. त्यामुळे काही परीक्षार्थींवर माहितीचा अधिकार कायद्याच्या आधारे स्वत:चे गुण जाणून घेण्याची वेळ आली होती. यावेळी उमेदवारांना त्याच मार्गाचा अवलंब करावा लागेल, अशी धास्ती व्यक्त होत असतानाच कंपनीच्या मनुष्यबळ विभागाने या दोन्ही पदांच्या भरतीत सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांचे ऑनलाईन चाचणी (सर्व उपचाचणी) आणि वैयक्तिक मुलाखतीचे गुण जाहीर करण्यात येतील, असे नमूद केले आहे. अंतिम निवड झाल्यावर (निवड यादी व प्रतिक्षा यादी), सर्व उमेदवारांचे गुण ऑनला्ईन चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीच्या गुणांसह प्रसिद्ध केले जातील, असे या विभागाने म्हटले आहे.