नाशिक – तांत्रिक अडचणी दूर करून महिनाभरात जिल्ह्यातील सीएनजी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीने दिल्यामुळे २६ एप्रिलपासून जिल्ह्यात सीएनजी विक्री बंद करण्याचा निर्णय तूर्तास मागे घेण्यात आला आहे. प्रत्येक पंपाला रोज पुरेसा सीएनजी देण्याचे कंपनीने मान्य केले.
अपुऱ्या पुरवठ्यामुळे पंपांवर वाहनधारकांना सीएनजी गॅस मिळणे जिकिरीचे झाले आहे. दुसरीकडे सीएनजी उपलब्ध होत नसल्याने पंपचालकही त्रस्तावले आहेत. यामुळे सुरळीत पुरवठा न झाल्यास २६ एप्रिलपासून जिल्ह्यात सीएनजी विक्री बंद करण्याचा इशारा नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर असोसिएशनने दिला होता. या घटनाक्रमानंतर सोमवारी कंपनीने तातडीने बैठक बोलावली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सीएनजी पंपचालकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
जिल्ह्यात सद्यस्थितीत सीएनजीचे एकूण ३५ ते ४० पंप आहेत. यातील १४ हे केवळ शहरात आहेत. यातील एकही पंप २४ तास सुरू ठेवता येईल, इतका सीएनजी पुरवठा होत नाही. परंतु, कंपनीच्या पंपांवर सीएनजीचा पुरेसा पुरवठा होतो., याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले. बैठकीत पंप चालकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. बैठकीस एमएनजीएलसह ऑईल कंपन्यांचे अधिकारीही उपस्थित होते. कंपनीने प्रत्येक पंपाला रोज किमान चार वाहने गॅस देण्याचे मान्य केले. सीएनजी वितरणात काही तांत्रिक अडचणी आहेत. महिनाभरात त्या पूर्ण करून सीएनजीचा पुरवठा सुरळीत केला जाईल. महिनाभराने पुन्हा बैठक घेण्याची तयारी कंपनीने दर्शविली. कंपनीशी सकारात्मक चर्चा आणि ठोस आश्वासन मिळाल्याने जिल्ह्यात २६ एप्रिलपासून सीएनजी विक्री बंदचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष विजय ठाकरे यांनी दिली.