नाशिक : शहर परिसरात करोनाग्रस्तांची संख्या ४५ हजारापुढे गेली असतांना मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ६६० वर पोहोचली असून दुसरीकडे, शहरात करोनामुळे वेळेत उपचार घेऊन बरे होणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. सद्यस्थितीत शहर परिसरात करोना रुग्णांचा मृत्युदर पाचवरून १.४ टक्क्यांवर आला आहे. वेळेत उपचार, जनजागृती आणि एकत्रित प्रयत्न या त्रिसूत्रीमुळे करोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

शहर परिसरात करोना रुग्णांची संख्या ४५ हजारापुढे गेली असली तरी त्यात लक्षणे नसणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. करोनाग्रस्तांची दिवसाला वाढणारी संख्या पाहता महापालिका रुग्णालयात खाटांची संख्या वाढविण्यात आली असून खासगी रुग्णालयातही खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. रेमडिसीवीर, टॅब्यू फ्लूसह अन्य औषधोपचाराची मुबलकता वाढविण्यात आली आहे. तसेच लोकांमध्ये करोनाविषयी जनजागृती करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात लक्षणे आढळल्यावर रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण त्यामुळे वाढले आहे. रुग्णांची संख्या पाहता उपचार पध्दतीत बदल करण्यात आले आहेत.

परिणामी करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. महापालिका परिक्षेत्रात बुधवारी ९०६ रुग्ण आढळले. तर, चार हजार ६८० रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात प्रतिबंधित क्षेत्राची संख्या २११२ वर पोहचली आहे. दरम्यान, देशपातळीवर नाशिक शहराचा मृत्युदर कमी आहे. करोनाचा संसर्ग वाढत असताना चार हजार रुग्णांमागे पाच असा मृत्युदर होता. सध्या हा मृत्युदर १.४ पर्यंत आला आहे. यामागे प्रशासकीय प्रयत्नांसह खाटांची उपलब्धता, वेळेत रुग्णांना मिळालेले उपचार, औषधे वेळेत मिळणे, ही कारणे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्णांना करोना आजाराविषयी आधी वाटणाऱ्या भीतीची जागा आता जनजागृतीमुळे उपायांनी घेतली आहे.

वेगवेगळ्या चाचण्यांमधून रुग्ण आपल्या शंकांचे समाधान करून घेत असल्याने चित्र बदलत असल्याचे महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.

जिल्ह्य़ातील स्थिती

जिल्ह्य़ात ५६ हजार ५८९ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. सध्या जिल्ह्य़ात नाशिक महानगरपालिका क्षेत्रात चार हजार ६८०, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ५६१ तर जिल्हाबाहेरील ९८ याप्रमाणे आठ हजार ४२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्य़ात आतापर्यंत ६६ हजार १२७ रुग्ण आढळले असून  एक हजार २०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, जिल्ह्य़ात रुग्ण बरे होण्याची टक्के वारी नाशिक ग्रामीणमध्ये ७९.७५, शहर परिसरात ८८.२१, मालेगावात ७९.५१, जिल्हा बाह्य़ रुग्णांचे  बरे होण्याचे प्रमाण ६८.७५ टक्के  असे आहे.

Story img Loader