नाशिक – राधानगरी धरणातून पाणी सोडले की, कोल्हापुरात पाच फुटाने पातळी वाढते. यंदा योगायोगाने आपण शिर्डीत होतो. त्यामुळे एक फूटही पातळी वाढली नाही, ही वस्तुस्थिती आहे. पाटबंधारे विभागाकडे चौकशी करून पडताळून पाहू शकता. पाच-सहा फूट पाण्यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असती, असे नमूद करीत राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूरात पूर न येण्याचा संबंध आपल्या शिर्डीत असण्याशी जोडला. त्यास तुम्ही श्रध्दा म्हणा, अंधश्रध्दा म्हणा किंवा काहीही म्हणा, असे समर्थनही त्यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुक्ताई भवानी अभयारण्यात व्याघ्रसंवर्धनार्थ जनजागृती; वन्यजीव संस्था, वनविभागातर्फे फेरी

रविवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संकटात आपण देवाला प्रार्थना करतो. निसर्गही देव आहे. कुठेतरी एक शक्ती, ताकद असते, असा दाखला त्यांनी दिला. शिर्डीहून नाशिकला येताना रस्त्यात आपणास एकही खड्डा लागला नाही. नाशिक-मुंबई रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पाणी आणि डांबर यांचे समीकरण जुळत नाही. केंद्र आणि राज्य सरकारने रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे मोठ्या प्रमाणात काम हाती घेतले आहे. त्यामुळे भविष्यात खड्डे आणि डांबरातून पैसे खाणारी मंडळी इतिहासजमा होतील, असा दावा केसरकर यांनी केला.

हेही वाचा >>> जामनेरजवळ बस-मालमोटार अपघातात सहा प्रवासी जखमी

शिक्षण विभागाचे नाव १०-२० टक्के वाईट लोक खराब करतात. लाचलुचपत प्रतिबंधकच्या सापळ्यात अडकलेले आणि तक्रारी आलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना सहा महिन्यांनी नियमानुसार सेवेत घ्यावे लागते. तेव्हा संबंधितांना नियुक्ती देताना त्यांचा जनसामान्यांशी संपर्क येणार नाही, याची दक्षता घेतली जाते. आमच्या कार्यकाळात खासगी शाळांना अतिशय जलदपणे परवानगी दिली गेली. यापुढे कुणालाही अनुदान मिळणार नाही. कारण, अनुदानाचा बोजा एक लाख कोटींवर पोहोचला आहे. एवढी रक्कम देण्यास मर्यादा आहेत. उध्दव ठाकरे यांची सत्ता गेल्यामुळे त्यांना राग आहे. त्यांच्या टिकेकडे दुर्लक्ष करायला हवे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करतात. त्यांना सलाईन लावावे लागते. प्रत्येकवेळी ते ठाकरे यांच्या टिकेला उत्तर देणार नाहीत. संभाजी भिडे यांनी राजकीय भाष्य करणे थांबवायला हवे. वयोमानामुळे त्यांच्याबाबत तसे घडत असेल, असे केसरकर यांनी सांगितले.

भुजबळांकडून खिल्ली

शिक्षणमंत्री केसरकर यांच्या विधानाची अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवली. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये अतिशय कमी जलसाठा आहे. त्यांनी इकडे यावे, देवाचा धावा करावा आणि आमची धरणे पूर्ण भरून द्यावी, असा टोला भुजबळांनी हाणला

असा मूर्खपणा केवळ… आपल्या प्रार्थनेमुळे पूर आला नाही, असे सांगण्याचा मूर्खपणा केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील मंत्री करू शकतो, इतर कुणी नाही, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केसरकर यांच्यावर टिकास्त्र सोडले. त्यांनी मणिपूरबाबत प्रार्थना करावी. केसरकरांनी स्वत:च्या मतदारसंघातील गावे बुडू नयेत म्हणूनही प्रार्थना करावी, असे त्यांनी सुनावले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak kesarkar interacted with the media in nashik talk about kolhapur flood control zws
Show comments