जळगाव : रावेर, जळगाव या लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेले महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत उमेदवारीपासून दूरच राहणार असून आघाडीकडून लढणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राज्यातील काही उमेदवारांचा विधानसभेच्या उमेदवारीवर डोळा आहे. तिकिटासाठी त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे पाठपुरावा सुरु केला असताना जळगाव आणि रावेरमध्ये वेगळे चित्र आहे. लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या विरोधात शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे) करण पाटील-पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्मिता वाघ सुमारे दोन लाख ५१ हजार ५९४ मतांनी विजयी झाल्या होत्या. लोकसभेच्या निवडणुकीनंतर करण पाटील हे राजकारणापासून काहीसे अलिप्त झाले. मात्र, विधानसभेची निवडणूक घोषित होताच ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, अमळनेर, जळगाव ग्रामीण, जळगाव शहर या विधानसभा मतदारसंघात ज्यांना कोणाला उमेदवारी मिळेल, त्यांचा प्रचार आपण करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. करण पाटील यांचे काका माजी मंत्री डॉ.सतीश पाटील हे स्वतः राष्ट्रवादीकडून (शरद पवार) एरंडोल-पारोळा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

हे ही वाचा…नाशिक : माती खातो म्हणून गळा दाबला गेला, अन्…

लोकसभेच्या रावेर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून (शरद पवार) उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. खडसे सुमारे दोन लाख ७१ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या. लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही पाटील यांनी स्वतःला पक्ष कार्यात गुंतवून घेतले आहे. विधानसभेची निवडणूक घोषित झाल्यानंतर उद्योजक पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर, चोपडा या विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बळ देणार असल्याचे म्हटले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Defeated mahavikas aghadi candidate from raver jalgaon lok sabha constituency is no longer in assembly elections sud 02