लोकसत्ता वार्ताहर
मालेगाव: करोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेतर्फे तीन कोटी खर्चाच्या करोना चाचणी प्रयोगशाळेचे काम सुरु करण्यात आले होते, मात्र दोन वर्षे उलटल्यावरही ही प्रयोगशाळा कार्यान्वित होऊ शकली नसल्याची तक्रार आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे. ही प्रयोगशाळा कार्यान्वित होण्यास अक्षम्य विलंब झाल्याने या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी समितीने केली आहे.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे सहायक आयुक्त अनिल पारखे आणि सचिन महाले यांची भेट घेऊन या संदर्भात त्यांना निवेदन दिले. निवेदनात करोना चाचणी प्रयोगशाळा सुरु करण्यात झालेल्या दिरंगाईबद्दल संशय व्यक्त करण्यात आला आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, विनानिविदा या कामासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर, या कामापोटी महापालिकेने संबंधित ठेकेदाराला दीड कोटीची रक्कमही दिली आहे. परंतु, अद्यापही प्रयोगशाळा सुरु होऊ शकलेली नाही. एवढा खर्च करुनही करोना संकट काळात ही प्रयोगशाळा उपयोगात येऊ शकली नाही. आता दोन वर्षांनी ती सुरु झाली तर ते साप म्हणून भूई थोपटण्यासारखे होणार आहे. त्यामुळे या साऱ्या प्रकारास कोण जबाबदार आहे, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे.
आणखी वाचा-नाशिकरोडमध्ये पुन्हा टोळक्याचा धुडगूस, कोयते, तलवारीने पाच वाहनांची तोडफोड
गेल्या वर्षी कॅम्प भागात सुरु करण्यात आलेल्या मॉड्युलर रुग्णालयात उपचाराच्या मूलभूत सुविधा प्राप्त होत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याची तक्रारदेखील समितीने केली आहे. सीएसआर फंड आणि महापालिकेचा निधी असे मिळून एकूण पाच कोटी खर्च करुन शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहे. मात्र सोनोग्राफी, ईसीजी, एक्स रे, रक्त यासारख्या चाचणींची व्यवस्था या रुग्णालयात उपलब्ध नाही. या ठिकाणी छताची सोय नसल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ऊन-पावसात ताटकळत उभे रहावे लागते. अनेकदा उपचाराच्या किमान सुविधाही उपलब्ध होत नाहीत. रुग्णालयापासून ५० मीटर अंतरावर मटण बाजार आहे. तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या परिसरात डासांची उत्पत्ती वाढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे मटण बाजार तेथून हटविण्यात यावा,अशी मागणी समितीने केली आहे. यावेळी समितीचे निखिल पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, विवेक वारुळे, दादा बहिरम, राजेंद्र पाटील, श्याम गांगुर्डे, अनिल पाटील, रोशन गांगुर्डे आदी उपस्थित होते.