धडाकेबाज आंदोलनांमुळे परिचित असलेल्या प्रहार संघटनेच्या नावाचा वापर करून संशयिताने सटाणा तालुक्यात डॉक्टरांकडे चक्क खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पैसे न दिल्यास त्याने आंदोलन करण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.
सटाणा येथील संशयित तुषार खैरनार (रा. औंदाणे) याने डॉ. हेमंत खैरनार (४७, रा. ठेंगोडा) यांच्याशी संपर्क साधत आपण प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष असून आपणांस २५ हजार रुपये द्यावेत, अन्यथा तुमच्या विरोधात संघटनेच्या वतीने आंदोलन करून बदनामी करण्यात येईल. रुग्णालय बंद करण्यात येईल, असा इशारा त्याने दिला. तुमच्या अन्य सहकाऱ्यांनाही पैसे द्यायला सांगा. पैसे न दिल्यास सर्व बीईएमएस डॉक्टरांची बदनामी करेल, अशी धमकीही त्याने दिली.
या धमकीला घाबरून काही डॉक्टरांनी त्याला १५ हजार रुपये दिले. पैसे मिळत असल्याने अनेकांना त्याने असेच लुबाडण्याचा प्रयत्न केला.
डॉ. खैरनार यांनाही या प्रकारामुळे मानसिक त्रास झाला. त्यांनी सटाणा पोलीस ठाण्यात तुशार खैरनारविरुद्ध खंडणी मागितल्याची तक्रार केल्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
काही दिवसांत ग्रामीण भागात वेगवेगळ्या संघटनांची नावे सांगत अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत किंवा अन्य काही कारणे दाखवीत गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे सामाजिक संघटनांची विश्वासार्हता धोक्यात आली असून अशा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीच याप्रकरणी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.