निर्यात बंद असल्याने शेतकऱ्यांवर हलाखीची स्थिती

नाशिक / मुंबई : बांगलादेश आणि श्रीलंकेत थांबलेली निर्यात, देशात इतरत्र झालेले उत्पादन यामुळे नाशिकसह महाराष्ट्रातील लाल कांद्याच्या मागणीत लक्षणीय घट होऊन कांद्याचे दर ५०० रुपये क्विंटलवर घसरले आहेत. दर गडगडल्याने कांदा बाजारात विकण्याऐवजी रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असताना जगभरातील अनेक देशांत कांदा टंचाई आणि महागाईने तेथील जनतेच्या डोळय़ांत पाणी आणले आहे.  फिलिपिन्स, तुर्कस्थान, मोरोक्को, उझबेकिस्तान तसेच युरोपातील अनेक देशांत सध्या कांद्याच्या दरांत लक्षणीय वाढ झाली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रात कांद्याचे दर चार वर्षांतील निचांकी पातळीवर आहेत. गेली तीन वर्षे कांद्याला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार रुपयांचा दर मिळाला होता. या वर्षांच्या सुरुवातीला, जानेवारीत  लासलगाव बाजारात ११ लाख ६२ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. त्यावेळी कांद्याला सरासरी १३९२ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. चालू महिन्यात आवक त्याच प्रमाणात असली तरी, दर मात्र ८०० रुपयांनी घसरले आहेत. घाऊक बाजारात कांद्याची मुबलक आवक होत असताना मागणी नसल्यामुळे दरात लक्षणीय घसरण झाल्याचे विश्लेषक सांगतात. याला निर्यातीत झालेली घट जबाबदार असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.

महाराष्ट्रातील विशेषत: नाशिकमधील कांद्याला श्रीलंका आणि बांगलादेश येथून अधिक मागणी आहे. मात्र, बांगलादेशने स्थानिक कांद्याच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आयातीवर बंदी आणली आहे. देशांतर्गत उत्पादित कांदा संपुष्टात येईपर्यंत बांगलादेश भारतीय कांद्याला परवानगी देणार नाही, असा अंदाज लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे तेथे कांदा पाठवण्यास स्थानिक व्यापारी तयार नाहीत. गेल्या सात-आठ वर्षांत पाकिस्तानात कांदा पाठवणेही थांबलेले आहे. देशांतर्गतदेखील गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांत स्थानिक कांद्याला प्राधान्य मिळत असल्याने नाशिकच्या कांद्याच्या दरांनी आपटी खाल्ली आहे.

महाराष्ट्रात कांद्याच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे. गेल्याच आठवडय़ात सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील राजेंद्र चव्हाण यांनी सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी नेलेल्या ५१२ किलो कांद्याला एक रुपया प्रति किलो इतका भाव मिळाला. वाहतूक आणि अन्य खर्च गेल्यानंतर चव्हाण यांच्या हातात अवघे अडीच रुपये उरले! या पार्श्वभूमीवर कांद्याला निश्चित दर देण्यासाठी शेतकरी संघटना केंद्र सरकारकडे आग्रह धरत आहेत. बाजारात अतिरिक्त असलेला कांदा सरकारने खरेदी करावा, अशी मागणीही करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंतर आता महाविकास आघाडीकडूनही कांदाप्रश्नी आंदोलनांना सुरुवात झाली आहे. शुक्रवारी सटाणा येथे आघाडीकडून दोन तास रास्ता रोको करण्यात आला. 

फिलिपिन्समध्ये तीन हजार रु. किलो!

पाकिस्तानातील महापूर, युक्रेन-रशिया युद्ध, मध्य आशियातील हवामान संकट आदी कारणांमुळे जगभरात कांद्याची टंचाई आणि महागाई भेडसावू लागली आहे. फिलिपिन्स या देशात तर कांदा मटणाहूनही महाग झाला आहे. तेथे सध्या प्रति किलो कांद्याला ७०० पेसो (३५१२ रुपये) इतका भाव आहे. हे दर नियमित दराच्या दहापट अधिक आहेत. युरोपातील नेदरलँड्स हा कांद्याचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. मात्र, दुष्काळामुळे तेथील पिकांवर परिणाम झाला असून कांद्याच्या दरांत विक्रमी वाढ झाली आहे. तुर्कस्थान, कझाकस्तान, मोरोक्को, उझबेकस्तान या देशांनी गेल्या काही दिवसांत कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणून देशात पुरेशी साठवण करण्यास सुरुवात केली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for red onion in maharashtra including nashik decreased due to high production zws