मालेगाव: मालेगाव महापालिकेतर्फे सुरू असलेल्या परिचारिका भरती प्रक्रियेत अंतिम निवड करण्याची हमी देत अज्ञात व्यक्तींकडून संबंधित उमेदवारांशी थेट भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून पैसे लाटण्याचा प्रयत्न होत असल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी संबधित उमेदवारांना सजग करत त्यांनी कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन केले आहे. ही भरती केवळ गुणवत्तेच्या आधारे होईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
महापालिकेतर्फे परिचारिकांची २० पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी ३० जून २०२२ रोजी जाहिरात देण्यात आली होती. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र-अपात्र उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागवण्यात आल्या. नाशिक विभागाच्या आरोग्य उपसंचालकांकडून या हरकतींवर निपटारा करण्यात आला. त्यानंतर पात्र यादीतील उमेदवारांना गुणवत्तेनुसार १:५ या प्रमाणात मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले. गेल्या २६ एप्रिल रोजी महानगरपालिकेच्या निवड समितीद्वारे या मुलाखती पार पडल्या.
आणखी वाचा- ऐन उन्हाळ्यात पुन्हा जल संकट, शनिवारी शहरात पुरवठा बंद
आता सदर भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या दरम्यान अज्ञात व्यक्तींकडून काही उमेदवारांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून परिचारिका भरतीच्या अंतिम यादीत निवड करण्याची हमी दिली जात आहे. त्या बदल्यात पैशांची मागणी केली जात आहे. उमेदवारांशी संपर्क साधणाऱ्या व्यक्ती आम्ही महापालिकेच्या आरोग्य खात्याशी संबंधित असल्याचा बहाणा करत असल्याचेही आढळून येत आहे. विशेष म्हणजे हे पैसे थेट बँक खात्यात जमा करण्यास सुचविले जात आहे. त्यामुळे आर्थिक फसवणूक करण्याच्या गोरख धंद्यात असलेल्या सायबर गुन्हेगारांचे हे कृत्य असल्याचा एक संशय व्यक्त केला जात आहे. काही जागरुक उमेदवारांनी महापालिका प्रशासनाकडे याबाबत विचारणा केल्यानंतर भरतीच्या नावे पैसे गोळा करण्याचे प्रयत्न होत असल्याचा प्रकार समोर आला. यास कोणी उमेदवार बळी पडले की नाही, याचा उलगडा होऊ शकलेला नाही. या प्रकाराची महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. मात्र या संदर्भात पोलिसात अद्याप कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.