नाशिक – सक्त वसुली संचलनालयच्या (इडी) माध्यमातून भाजपा सत्तेचा गैरवापर करीत असल्याची तक्रार करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सत्ताधारी भाजपाच्या कार्यशैलीमुळे देशातील लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपाकडून केवळ दबावासाठी, मनमानीपणे इडी, सीबीआयसारख्या संस्थांचा वापर केला जात असल्याचा आरोप केला.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना इडीने समन्स बजावले आहे. पाटील यांचा आयएल व एफएलएससोबत कुठलाही संबंध नसताना त्यांच्यासोबत गैरव्यवहार केल्याचा आरोप करीत चौकशीसाठी बोलावले गेल्याचा दावा राष्ट्र्रवादीकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
भाजपाकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य करून मानसिक खच्चीकरण केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. न्यायालय आरोपात तथ्य नसल्याने निर्दोष मुक्तता करीत आहे. या प्रकारामुळे नेत्यांची बदनामी होऊन जनमानसातील प्रतिमा मलीन होत असल्याचे आंदोलकांच्या शिष्ट मंडळाने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. भाजपाच्या दुटप्पी व कुटील धोरणाविरोधात कारवाई करून देशातील लोकशाही वाचवावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.