नाशिक: शहरासह जिल्ह्यात डेंग्यू रुग्णांचा आलेख उंचावत आहे. डेंग्यू चाचणीशी संबंधित संचांचा तुटवडा जाणवू लागला असताना प्राथमिक चाचणीसाठी १२०० तसेच त्यानंतर डेंग्यू निदानासाठी आवश्यक असलेले ४०० संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत, नाशिक आणि मालेगाव महानगर पालिकांमध्ये डेंग्यूशी संबंधित नमुन्यांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर दिला असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

शहरासह जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण दिवसागणिक वाढत असल्याने शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या वतीने आंदोलन करुन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पार्श्वभूमीवर, शनिवारी पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत डेंग्यू आजाराविषयक आढावा बैठक झाली. बैठकीनंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सद्यस्थितीत शहरासह जिल्ह्यातील निफाड आणि दिंडोरी येथे डेंग्यूचे रुग्ण अधिक आहेत. नाशिक महानगर पालिका हद्दीत एक हजार ७२१ डेंग्यूसदृश रुग्णांची प्राथमिक चाचणी करण्यात आली. यामधील ४७४ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यातील काही रुग्णांना खासगी तर काहींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून तो डेंग्यूमुळे की अन्य कारणामुळे, हे स्पष्ट झाले नसल्याचे भुसे यांनी सांगितले.

हेही वाचा : इंडियन बँकेच्या अंबड शाखेवर दरोडा

दोन दिवस शहरात डेंग्यू तपासणीचे संच नव्हते. आता प्राथमिक चाचणीसाठी १२०० संच तर त्यानंतरच्या पुढील चाचणीसाठी शनिवारी सायंकाळपर्यंत ४०० संच उपलब्ध होणार आहेत. पुढील दोन दिवसात ४०० संच मागविण्यात आले आहेत. पहिल्या चाचणीत डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर त्वरीत उपचार सुरु होत आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाच्या वतीने समितीने शहर परिसरातील भागांमध्ये पाहणी करत आरोग्य विभागाला सूचना केल्या होत्या. त्यानुसार डेंग्यूसंदर्भात प्रबोधन करण्यात येत असून दंडात्मक कारवाईवर भर देण्यात येत आहे. गरज पडल्यास टँकरद्वारे फवारणी करण्याची तयारी ठेवा, असे सांगण्यात आले.

सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात डेंग्यूविषयक दुसऱ्या चाचणीसाठी केंद्र सुरू आहे. तपासणीत येणाऱ्या अडचणी पाहता मालेगाव आणि नाशिक महानगरपालिकेसाठी स्वतंत्र प्रयोगशाळांसंदर्भात वरिष्ठ पातळीवर अहवाल देण्यात आल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले. त्याला मान्यता मिळाल्यास कायमस्वरूपी व्यवस्था होईल. डासांच्या अळ्या तयार होणाऱ्या ठिकाणीच त्यांचे निर्मूलन होण्यासाठी गोळी देण्यात येते. महापालिकेच्या वतीने या गोळ्या देण्यात येणार आहेत.

हेही वाचा: मनमाड : रेल्वे पोलिसांच्या समयसुचतेमुळे दोन महिलांसह बाळाचे प्राण वाचले

डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ

नाशिक महापालिका हद्दीत एक हजार ७२१ डेंग्यूसदृश रुग्ण आहेत. त्यातील ४७४ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना खासगी तसेच महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक चाचणीसाठी १२०० तर पुढील चाचणीसाठी ४०० संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डेंग्यू निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजनांसह दंडात्मक कारवाईवर भर देण्यात येणार आहे.