आदिवासी विकास विभागातील उपायुक्त सुदर्शन नगरे यांचा वाढदिवस बुधवारी कार्यालयात शाही थाटात साजरा करण्यात आला. साहेबांचे आगमन झाल्यानंतर कोल्ड फायरच्या आतषबाजीने कार्यालय उजळून निघाले. ‘बॉस’ उल्लेख असणारा केक कापला गेला. हा दिवस संस्मरणीय करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कंबर कसली होती. या घटनेची गंभीर दखल घेत आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनी तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

हेही वाचा >>> धुळ्यात लाचखोर पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार जाळ्यात

आदिवासी विकास विभागाचा कारभार वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत असतो. यात उपायुक्त नगरे यांच्या चक्क कार्यालयात अतिशय थाटामाटात साजरा झालेल्या वाढदिवसाची भर पडली. याची छायाचित्रे व चित्रफिती समाजमाध्यमात पसरल्यानंतर संबंधितांवर सारवासारव करण्याची वेळ आली. शाही थाटमाट पाहून अन्य विभागातील अधिकारी व कर्मचारी अवाक झाले. साहेबांच्या आगमनापासून ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यापर्यंतच्या नियोजनात कर्मचारी व सहकाऱ्यांनी कुठलीही कसर ठेवली नाही. नगरे यांचे कार्यालयात आगमन होताच कोल्ड फायरची आतषबाजी झाली. रंगीत पाकळ्यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. साहेबांच्या हस्ते केक कापून जल्लोष करण्यात आला. भारदस्त पुष्पगुच्छ देण्याची चढाओढ लागली. या नियोजनाने साहेबही भारावून गेले. सर्वांच्या शुभेच्छांचा त्यांनी हसतमुखाने स्वीकार केला. या वाढदिवसाची चर्चा सर्वदूर पसरल्यानंतर उपायुक्त नगरे यांनी अशा प्रकारे वाढदिवस साजरा केला जाईल, याची आपणासही कल्पना नव्हती, असे नमूद केले.

अधिकारी, कर्मचाऱ्यांना तंबी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यापुढे कार्यालयात असे प्रकार घडू नयेत असे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना परिपत्रकाद्वारे तंबी देण्यात आली आहे.

Story img Loader