लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: एरंडोल तालुक्यातील खडके येथील (कै.) य. ब. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. राज्याचे महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत, तसेच या बालगृहातील बाललैंगिक अत्याचाराची सखोल चौकशी करण्यासाठी पाचसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीला तीन ऑगस्टपर्यत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बालगृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणी बालगृहाचे काळजीवाहक गणेश पंडित, अधीक्षिका अरुणा पंडित आणि संस्थेचे सचिव भिवाजी पाटील यांच्याविरुद्ध २६ जुलैला एरंडोल येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव जिल्हा महिला व बालविकास अधिकार्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार संस्थेत घडलेली घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.
हेही वाचा… नाशिक: अधिकमासामुळे त्र्यंबकच्या अर्थचक्राला गती; देवस्थानकडून देणगी दर्शन बंद
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई उपनगर येथल खार सांताक्रुझ नागरी प्रकल्पाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी प्रेमा घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली पाचसदस्यीय विशेष तपासणी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश महिला व बालविकास उपायुक्त राहुल मोरे यांनी दिले आहेत.