उत्पादन आणि वाहन उद्योगांची गरज लक्षात घेऊन बी. टेक (मॅकेट्रॉनिक्स), प्राथमिक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्राशी संबंधित अभ्यासक्रम नाशिक येथील केंद्रात सुरू करण्याचा मनोदय महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने व्यक्त केला आहे. या विद्यापीठाचे केंद्र सातपूरच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या (आयटीआय) परिसरात कार्यान्वित केले जाणार आहे. येत्या जुलैपासून हे अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी प्रगतीपथावर आहे.
हेही वाचा- खडसे पती-पत्नीच्या अडचणीत वाढ
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी सातपूर येथील आयटीआय येथील जागेची पाहणी केली. नंतर उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आणि उद्योजकांशी संवाद साधला. स्थानिक पातळीवर कुठले उद्योग आहेत, त्यांची गरज काय, हे लक्षात घेऊन विद्यापीठ अभ्यासक्रमांचे नियोजन करीत आहे. नाशिकमधील उद्योगांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे डॉ. पालकर यांनी सांगितले. विद्यापीठ कौशल्य विकासावर आधारीत अभ्यासक्रम उपलब्ध करणार आहे. नाशिकमध्ये विद्यापीठाचे केंद्र जून, जुलैपर्यंत कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे. विद्यापीठा्च्या धोरणानुसार कुठलाही अभ्यासक्रम ४० टक्के पुस्तकांवर तर, उर्वरित ६० टक्के प्रत्यक्ष कार्यानुभवावर आधारीत असतील. त्यामुळे उद्योगांचे सहकार्य महत्वाचे आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक चर्चेअंती नाशिकमधील वाहन, उत्पादनाशी संबंधित उद्योगांची गरज लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची आखणी केली जाणार आहे. या संदर्भात सामंजस्य करार झाल्यानंतर जानेवारी अखेरीस त्या अभ्यासक्रमांची यादी प्रसिध्द केली जाईल.
हेही वाचा- जळगाव : सफाई कामगारांचा संप; वाॅटरग्रेस कंपनीकडून थकबाकीसह वेतनवाढीची मागणी
अन्य क्षेत्रातील उद्योगांनीही विद्यापीठाशी संपर्क साधून अभ्यासक्रमांसाठी साकडे घातले. कौशल्य विद्यापीठ विविध विषयांत पदवी (चार वर्ष) आणि पदविका ( एक वर्ष) असे दीर्घकालीन अभ्यासक्रम सुरू करणार आहे. उद्योगांची गरज लक्षात घेऊन हे अभ्यासक्रम विकसित केले जातील. विद्यापीठ अनुदान आयोग आणि नवे शैक्षणिक धोरण यांचा विचार करून श्रेयांक पध्दतीने मूल्यमापन केले जाणार आहे.
हेही वाचा- केंद्रीय अन्नधान्य खरेदी पोर्टलमुळे ५१ लाख शेतकर्यांना लाभ; डाॅ. हिना गावित
सॅटलाईट केंद्र म्हणजे काय ?
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नाशिक येथे केंद्र (सॅटेलाईट केंद्र) कार्यान्वित केले जाणार आहे. नाशिक केंद्रासाठी सातपूरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारातील मोकळ्या जागेची पाहणी करण्यात आली. या केंद्रात विद्यार्थी प्रवेश घेतील. या केंद्रामार्फत संपूर्ण अभ्यासक्रम राबविला जाईल. त्यासाठी विविध विद्याशाखांचे अध्यापक असतील. उद्योगांमधून काही तज्ज्ञांना निमंत्रित केले जाईल, असे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले.