नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ आणि विधानसभेच्या २०० जागा जिंकण्यासाठी भाजपने महाविजय- २०२४ अभियान शनिवारी जाहीर केले. राष्ट्रवाद आणि विकासाच्या मूलमंत्राने विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी समाजमाध्यमांवर सक्रिय होण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले.

नाशिकच्या सातपूर येथील डेमोक्रसी हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरम् बावनकुळे, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, मुंबईचे अध्यक्ष आ. आशीष शेलार आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा शनिवारी सायंकाळी समारोप झाला. बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली असली तरी मुख्य मुद्दा लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकांसाठी रणनीती हाच राहिला.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी मतदारसंघनिहाय पूर्णवेळ कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाणार असल्याचे जाहीर केले. कार्यकारिणीच्या समारोप सत्रात फडणवीस यांनी महाविजय अभियानाची घोषणा केली. महाविकास आघाडीने अडीच वर्ष वाया घालवली. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपला अडीच वर्षांत पाच वर्षांचे काम करायचे आहे, असे ते म्हणाले. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या घटनाबाह्य सरकारच्या आरोपाबाबतही त्यांनी भाष्य केले. ‘‘उरलेसुरलेले लोक पक्षांतर करू नये, म्हणून त्यांना तसे बोलावे लागते. राज्यात स्थापन झालेले सरकार १०० टक्के कायदेसंमत आहे. न्यायालयाचा निकालही आपल्या बाजूने येणार आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करून नव्याने दीडपट जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येईल’’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘‘महाविकास आघाडी सरकारने भाजप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. आपल्याला कारागृहात टाकण्यासाठी जंग जंग पछाडले होते. पण ते काही करू शकले नाहीत. ज्यांना ही जबाबदारी दिली, तेच कारागृहात गेले’’, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. नाशिक-पुणे जलदगती रेल्वेमार्गाला मान्यता मिळाली. मराठवाडय़ासह अन्य भागातील प्रलंबित सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याचे नियोजन करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.

समाजमाध्यमांवर सक्रिय नसल्यास उमेदवारी नाही
२०२४ च्या निवडणुकीत समाजमाध्यमे अतिशय महत्वाची ठरणार आहेत. निवडणुकीत १८ ते ३० वयोगटातील समाजमाध्यमांशी जोडलेल्या तरुण मतदारांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. विरोधकांना या माध्यमाचे महत्व कळायला लागले असून त्यांच्याकडून नकारात्मकता पसरवली जाते. तथापि, भाजपची शक्ती दाखवून समाजमाध्यमे व्यापून टाकण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले. आदल्या दिवशी कार्यकारिणीच्या बैठकीत समाजमाध्यमांवर २५ हजार समर्थक नसल्यास उमेदवारीही दिले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. विरोधक समाजमाध्यमांवर सक्रिय होऊ लागल्याने त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज करण्याचा संदेश देण्यात आला आहे.

फडणवीस-पंकजा मुंडे एकाच मोटारीतून बैठकस्थळी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे हे दोघे एकाच मोटारीत बैठकस्थळी पोहोचले. उभय नेत्यांमध्ये फारसे सख्य नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच होते. त्यामुळे उभयतांना एकत्र आल्याचे पाहून सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला. हॉटेलमधून उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मोटार मार्गस्थ होणार होती. आपली मोटार मागे होती. त्यामुळे आम्ही एकाच गाडीत आल्याचे मुंडे यांनी नमूद केले.

Story img Loader