नाशिक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी नेते छगन भुजबळ हे ओबीसी-मराठा समाजात तेढ निर्माण करीत असून त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी केला आहे. हे षडयंत्र मराठा समाजाने यशस्वी होऊ द्यायचे नाही. ग्रामीण भागात मराठा आणि ओबीसी समाज एकत्र असून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांनी मराठा आरक्षणाचा चेंडू परस्परांकडे टाकण्याचा खेळ सुरू केला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ”शरद पवारांनी मराठा समाजाचे वाटोळे केले”; मनोज जरांगेंचं टीकास्र; म्हणाले, ”त्यांना जमलं नाही म्हणून…”

जरांगे यांनी राज्यात काढलेल्या मराठा आरक्षण शांतता फेरीचा मंगळवारी येथे समारोप झाला. शहरात सात किलोमीटरची फेरी काढण्यात आली. प्रकृतीच्या कारणास्तव फेरीत काही काळ जरांगे यांना रुग्णवाहिकेतून मार्गक्रमण करावे लागले. फेरीत प्रारंभापासून ओबीसी नेते भुजबळ यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू होती. खुद्द जरांगेंनी भाषणात त्यांच्यावर कठोर टीका केली. आगामी विधानसभा निवडणुकीत भुजबळांना पराभूत केले जाईल. भुजबळांनी प्रथम शिवसेना, नंतर राष्ट्रवादीला उदध्वस्त केले. आता तीच वेळ भाजपची असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाची माहिती घेऊन सकल मराठा समाजाने २९ ऑगस्टला अंतरवाली सराटीला जमायचे आहे. त्याठिकाणी चर्चा करून निवडणूक लढवायची की उमेदवार पाडायचे, हे निश्चित होईल, असे जरांगे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> मनोज जरांगे यांच्या शांतता फेरीत छगन भुजबळ लक्ष्य; नाशिकमध्ये फेरीच्या प्रारंभापासून भुजबळांविरोधात घोषणाबाजी

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक चुका केल्या. मराठा समाजाला जे मागितले नव्हते ते आरक्षण दिले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवे आहे. त्यांंच्याकडून फोडाफोडीचे राजकारण होत आहे. समन्वयक फो़डले जात आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न मिळाल्यास भाजपच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत उखडून टाकले जाईल, असा इशारा जरांगेंनी दिला. नारायण राणे हे वयाने व अनुभवाने मोठे असल्याने आम्ही त्यांचा सन्मान करतो. फडणवीसांचे ऐकून ते बोलतात. राणेंनी मर्यादा पाळायला हवी, अन्यथा आम्ही मागे लागलो तर सोडणार नाही, असेही त्यांनी सूचित केले.

पुन्हा मुंबईत धडकण्याचे संकेत लोकसभा निवडणुकीत जिरल्याने भाजपने विधान परिषदेतील आमदारांना आपल्या विरोधात पुढे केले आहे. प्रवीण दरेकर यांच्यासह विधान परिषदेतील आमदार बोलत आहेत. या आमदारांच्या मुंबईतील घरात एकदा जावून येण्याचा विचार आहे. ते कसे राहतात, एकदा बघायचे असल्याचे सांगत मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा नव्याने मुंबईला जाण्याचे संकेत दिले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis chhagan bhujbal plotting to create riots allegations by manoj jarange zws