लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: बारसू रिफायनरीच्या विषयावर माजी मंत्री आदित्य ठाकरे हे किमान थोडा अभ्यास करून बोलतील, आपले भाषण ऐकून बोलतील, अशी अपेक्षा होती. पण, त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आहे. ज्यांना केवळ विरोधाला विरोध करायचा आहे. त्यांना उत्तर देऊन उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.
शनिवारी येथे महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील दीक्षांत सोहळ्यानंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यानंतर विरोधक गुजरात न्यायालय दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप करीत आहेत. यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांचे विधान कसे अयोग्य आहे, उच्चपदस्थ लोकांनी अशी विधाने का करू नये, असेही सांगितल्याकडे लक्ष वेधले. अशा प्रकारे निकाल आल्यानंतर कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयावर आक्षेप घेणारे काँग्रेस आणि विरोधक आता न्यायालयाचे गुणगान गात आहेत. त्याचे समाधान आहे. न्याय मिळाला तर सर्वोच्च न्यायालय चांगले आणि निकाल विरोधात गेला तर न्यायालय वाईट, अशी विरोधकांची कार्यशैली उघड झाली आहे. विरोधक घटनात्मक संस्थांचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. औरंगजेबाच्या मुद्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी या संदर्भात सभागृहात सविस्तर भूमिका मांडली असल्याने कुणाला जाब जबाब देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.
निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत त्यांनी निवृत्तीनंतर कुणाला जनतेची सेवा करावी, असे वाटत असेल तर ती चांगली बाब असल्याचे नमूद केले. राज्याच्या पावसाळी अधिवेशनातून शेतकऱ्यांना मदत. आवास योजनेतून १० लाख घरे आदी महत्वाचे विषय मार्गी लागले. अनेक विधेयके मंजूर झाल्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला वेग प्राप्त होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.