शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांचा आक्षेप
सिंहस्थात चीनच्या मानसरोवरातील जल आणि गोदावरीचे जल यांचा संगम करण्याची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कृती धर्मविरोधी असल्याचा आक्षेप नोंदवत शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी या माध्यमातून उभय देशात कोणती मैत्री साधली जाईल, असा प्रश्न उपस्थित केला.
त्र्यंबकच्या तिसऱ्या पर्वणीवेळी भारत-चीन संबंध दृढ व्हावेत, या उद्देशाने मुंबईतील चिनी दुतावास आणि ऑब्झव्र्हर रिसर्च फाऊंडेशन यांच्यावतीने कुशावर्त तीर्थात कैलास मान सरोवराचे जल अर्पण करण्याचा सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला होता.
या संगमातून कुंभमेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. यावर शंकराचार्यानी आगपाखड केली आहे. वास्तविक, गोदावरी सर्वोच्च असून तिला कोणाची गरज नाही. सिंहस्थात देश-विदेशातील हिंदू बांधव स्नानासाठी गोदाकाठी येतात. असे असताना मानसरोवराचे पाणी आणून मुख्यमंत्र्यांनी गोदावरीचे महत्व कमी केल्याचा आरोप त्यांनी केला. चीनने भारताची हजारो एकर जमीन बळकावली.
भारताच्या अनेक प्रकल्पांत त्याच्याकडून अवरोध आणले जातात. या स्थितीत जल मिलनाद्वारे कोणतीही मैत्री साध्य होणार नसल्याचे त्यांनी सूचित केले.
सनातन संस्थेवर बंदी घालण्याऐवजी शासनाने डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना प्रथम जेरबंद करावे. एखादी व्यक्ती दोषी असेल तर त्यासाठी संस्थेला जबाबदार धरणे योग्य नाही. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र शासनाने जादुटोणा
विरोधी कायदा मंजूर केला. मात्र, शासनाच्या अखत्यारीतील शिर्डीच्या साई संस्थानमार्फत अंधश्रध्दा पसरविली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.