मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
तीर्थक्षेत्र मांगीतुंगी परिसराच्या विकासासाठी शासनाने जाहीर केलेल्या ३३० कोटींच्या पॅकेजमधील केवळ ५५ कोटीचा निधी विकास कामांसाठी मिळाला असला तरी उर्वरित निधीही देऊन विकास कामे पूर्ण केले जातील. या परिसराचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास होण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सोमवारी मांगीतुंगी येथे विश्वशांती संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी परिसराच्या विकासाविषयी माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी मांगी-तुंगीच्या विकासासाठी दीड वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या ३३० कोटी रुपयांपैकी अवघे ५५ कोटी रुपये विकास कामांसाठी उपलब्ध करून दिले. उर्वरित २७५ कोटी रुपयांचा निधी अद्याप दिलेला नाही. त्यामुळे या परिसरातील रस्ते, पाणी, वीज अशा अनेक मूलभूत सोयीसुविधांचा आजही परिसरातील गावांमध्ये अभाव असल्याने हा निधी तात्काळ विकास कामांसाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करीत बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी लक्ष वेधले.
भगवान श्री ऋषभ देव जैन मूर्ती निर्माण समितीचे कर्मयोगी पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी यांनीही हा निधी तत्काळ विकासासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानंतर संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनीही हाच मुद्दा उपस्थित करत निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांना केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मांगीतुंगीच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, असे सांगितले. शासन स्तरावर विकास कामांच्या बाबतीत जे प्रस्ताव सादर झाले आहेत, त्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
लवकरच मुंबई येथे विश्वशांती अहिंसा भवन निर्माण करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. त्यासाठी सिडकोकडे पाठपुरावादेखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक तीर्थक्षेत्रांची भूमी आहे. पर्यटन विकासाला येथे मोठा वाव असल्याने पर्यटनाच्या विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.