Mahashivratri 2025 Wishes Updates : नाशिक – बम बम भोले.. ओम नमो शिवाय, अशा जयघोषात जिल्ह्यात महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांनी मंदिरांमध्ये बुधवारी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. त्र्यंबकेश्वर येथे भक्तांना पाच ते सहा तास रांगेत ताटकळत राहावे लागले. जिल्ह्यातील इतर मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी रात्री उशीरापर्यंत कायम होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदा प्रयागराज येथे महाशिवरात्रीच्या दिवशी महाकुंभाची समाप्ती होत असल्याने महाशिवरात्रीला विशेष महत्व प्राप्त झाले. यामुळे उत्तर भारतीयांसह दक्षिण भारत, गुजरात, महाराष्ट्रसह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गर्दी केली. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच कुशावर्तावर स्नान करुन भाविकांनी त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या. पाच तासांहून अधिक प्रतिक्षेनंतर भाविकांना दर्शन झाले. भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी चित्रभिंती उभ्या करत मंदिराच्या गर्भगृहातील पूजेचे चित्रण दाखविण्यात आले. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी पाण्याची तसेच उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी व्यवस्था करण्यात आली. भाविकांची गर्दी वाढत गेल्यावर सुरक्षा रक्षकांची अरेरावीही वाढत गेली. भाविकांशी मोठ्या आवाजात बोलणे, हुज्जत घालणे सुरू होते. काही भाविक सुरक्षारक्षकांना न जुमानता रांगेत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याने वादाचे प्रसंग दर्शन वेळेत होत राहिले.

सायंकाळी देवस्थानच्या वतीने श्रींच्या मुखवट्याची पालखी काढण्यात आली. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत,पूजन करण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बसचे नियोजन करण्यात आले होते. त्र्यंबकनजीक असलेल्या प्रती केदारनाथ येथेही महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. जिल्ह्यातील काववई, टाकेद, सिन्नरचे गोंदेश्वर, बागलाण तालुक्यातील दोधेश्वर आदी शिवमंदिरांमध्येही भाविकांनी गर्दी केली होती. शिवमंदिरांना आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

पंचवटीतील श्री कपालेश्वर मंदिर परिसरात भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. कोंडी टाळण्यासाठी मंदिराकडे येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन तसेच सीसीटीव्हीचा वापर करण्यात आला. गरूडझेप अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांची भूमिका निभावली. देवस्थानच्या वतीने भाविकांना रुद्राक्ष तसेच प्रसादाचे वाटप झाले. सोमेश्वर येथे दुपारी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते आरती करण्यात आली. महाप्रसाद वाटप, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर आदी कार्यक्रम घेण्यात आले.

सामाजिक संस्थांतर्फे उपक्रम

सामाजिक संस्था तसेच शिवभक्तांच्या वतीने चौका चौकात, गोदाकाठावर शिवप्रतिमा स्थापन करुन पूजन, अभिषेक, महाप्रसाद वाटप असे कार्यक्रम करण्यात आले. काही संस्थाच्या वतीने रक्तदान शिबीरासह अन्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.

सोमेश्वर येथे पोलीस दरबार

सोमेश्वर येथे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आरती केल्यानंतर उपस्थित भाविकांशी संवाद साधला. मंदिर परिसरातच पोलिसांचा दरबार भरवला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी आपल्या परिसरातील अडचणींकडे लक्ष वेधत वाहतूक, वाहनतळ याविषयी चर्चा केली.