राज ठाकरेंकडून पोलिसांची पाठराखण
पहिल्या शाही पर्वणीतील कडेकोट बंदोबस्तावरून पोलिसांवर चौफेर टीकास्त्र सोडले जात असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र पोलीस यंत्रणेची पाठराखण केली आहे. लोखंडी जाळ्यांची उभारणी आणि भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडणे हे नियोजन भाविकांची काळजी व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.अतिरेकी बंदोबस्तामुळे मागील तीन ते चार दिवसांपासून विविध माध्यमातुन पोलिसांविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे पुढील पर्वण्यांसाठी प्रशासनाने नियोजनात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. या घडामोडीत चोख बंदोबस्तामुळे पहिली पर्वणी कोणत्याही दुर्घटनेविना पार पडली, या दुसऱ्या बाजूकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. राज यांनी नेमके त्याच मुद्यावर बोट ठेवले.पांडवलेणीच्या पायथ्याशी साकारण्यात येणाऱ्या वनौषधी उद्यानाचे भूमीपूजन शुक्रवारी सकाळी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले. टाटा समुहाचे अधिकारी धारकर यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. कार्यक्रमास महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, राहुल ढिकले हेही उपस्थित होते. या वनौषधी उद्यानाची जबाबदारी टाटा समुहाने स्वीकारली आहे. चार दिवसीय दौऱ्यात माध्यमांशी संवाद न साधणाऱ्या राज यांनी यावेळी विविध मुद्यांवर आपली भूमिका मांडली. पर्वणीतील बंदोबस्ताद्वारे भाविक वा नागरिकांना त्रास देण्याचा यंत्रणेचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी नमूद केले.अंबाणी, टाटा, महिंद्रा यांच्यासह अनेक बडे उद्योग समूह आपल्या सामाजिक जबाबदारी निधीतील मोठी रक्कम नाशिकमध्ये विविध प्रकल्पांवर खर्च करत आहेत. या निधीतून इतकी मोठी रक्कम उपलब्ध होणारे नाशिक हे देशातील पहिले शहर ठरणार असल्याचे राज यांनी नमूद केले. मागील वर्षी रिलायन्स फाऊंडेशनने गोदा उद्यान प्रकल्पाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. पांडवलेणीच्या पायथ्याशी साकारल्या जाणाऱ्या वनौषधी उद्यानाची धुरा आता टाटा समुहाने स्वीकारली आहे. महिंद्राच्या सहकार्याने उद्यानही विकसित केले जाणार आहे. असे अनेक बडे उद्योग समूह सामाजिक जबाबदारीसाठीचा आपला निधी नाशिकसाठी उपलब्ध करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.