‘पर्वणी’वर मेघराजाची बरसातखास
शाही मिरवणूक आणि स्नानास पावसाची मुसळधार हजेरी.. रामकुंड परिसरात तासभर ताटकळावे लागल्याने दिगंबर आणि निर्माही आखाडय़ांच्या महंतांचा झालेला संताप.. महंतांची समजूत काढताना प्रशासनाची झालेली केविलवाणी अवस्था.. अखेरची पर्वणी आणि त्यातच ऋषिपंचमी असल्याने भर पावसात भाविकांची उसळलेली गर्दी..नारोशंकर मंदिरालगतच्या पटांगणावर साधू-महंतांच्या मोटारी आणि भाविकांच्या गर्दीमुळे उडालेला गोंधळ..
कुंभमेळ्यातील तिसरी शाही पर्वणी शुक्रवारी काही वाद-विवादांचा अपवाद वगळता येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. दिवसभर संततधारेमुळे स्नानासाठी आलेल्या भाविकांसह बंदोबस्तावरील पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांचे कमालीचे हाल झाले. पावसामुळे मिरवणूक कुठेही रेंगाळली नाही. स्नानानंतर परतताना आखाडय़ांची क्रमवारी बदलणार होती. त्याचा लाभ उठवत भाविकांनी थेट रामकुंडावर घुसखोरी करत स्नानाचा आनंद लुटल्याचे पहावयास मिळाले.
जगातील सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभमेळ्यातील येथील अखेरच्या शाही पर्वणीचा दिवस मुसळधार पावसाने गाजवला. पहाटे चारपासून विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे वेळेत मिरवणूक सुरू होईल की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. परंतु, नियोजित वेळेत सकाळी सहा वाजता मिरवणुकीला सुरूवात झाली. निर्मोही, दिगंबर आणि निर्वाणी असा मिरवणुकीला रामकुंडावर जाताना क्रम होता. पावसात ढोल-ताशांचा गजर, बँड पथक, पारंपरिक शस्त्रास्त्रांद्वारे साहसी खेळांचे प्रदर्शन साधुंकडून करण्यात आले. याआधीच्या पर्वणीच्या तुलनेत मिरवणुकीतील रथांची संख्या कमालीची घटली. काही महंतांनी रस्त्यावरून पायीच रामकुंडावर जाणे पसंत केले. शाही मार्गावरील बराचसा भाग काहिसा उताराचा आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी पावसाचे पाणी वाहत होते. साधुंनी ढोलच्या तालावर नाचण्याची हौस पूर्ण केली. मिरवणुकीत परप्रांतीय भाविकांची संख्या अधिक होती.
गाडगे महाराज पुलाखालील सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने पालिकेच्या वतीने ते उपसण्यासाठी पंपाचा आधार घेण्यात आला. महंतांची वाहने नारोशंकर मंदिरालगतच्या पटांगणावर थांबविण्यात आली. मिरवणुकीत भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाल्याने परिसरात ही वाहने आणि भाविकांची एकच गर्दी झाली. मुख्य रस्त्यावरून गोदा काठालगतच्या पटांगणात उतरण्याच्या मार्गाचा काही भाग तीव्र उताराचा आहे. खालशांच्या वाहनात शेकडो भाविकही बसल्याने उतारावर वाहनांची विचित्र स्थिती निर्माण होत होती. चढावरून वर जाणारे वाहन मागे परत येणे आणि उतरणारे वाहन अकस्मात समोर येत असल्याने भाविकांची तारांबळ उडत होती.
पावसामुळे पटांगणात फारसे पोलीसही नव्हते. दीड ते दोन तास हा गोंधळ परिसरात सुरू होता. पावसामुळे भाविक व पोलीस यंत्रणेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.
काही पोलिसांकडे बचावासाठी जॅकेट असले तरी काहींकडे ते नसल्याने त्यांना भिजतच आपले कर्तव्य पार पाडावे लागले. महिला कर्मचाऱ्यांची स्थिती अधिकच बिकट होती. रामकुंड परिसरात महिला पोलिसांची संख्या कमी असल्याने स्नानानंतर महिलांना बाहेर काढण्याचे कामही बहुतांश प्रमाणात पुरूष कर्मचाऱ्यांनाच करावे लागले.
पालकमंत्री गिरीश महाजन आणि पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन हे स्वत: काहीवेळ भाविकांना कुंडाबाहेर काढण्याचे काम करत असल्याचे पाहावयास मिळाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा