अंतर्गत वाद, आर्थिक स्थैर्य, जागेचा अभाव
सार्वजनिक गणेशोत्सवात ‘डीजे’ च्या दणदणाटावर बंदी आणल्यापासून ढोल-ताशाचा भाव काही अंशी वधारला आहे. आगामी गणेशोत्सवात मानाच्या गणपतीसमोर ढोल-ताशाची सेवा देता यावी यासाठी शहरातील २० पेक्षा अधिक पथकांनी कंबर कसली आहे. त्यांच्यासमोर अंतर्गत वाद, आर्थिक अस्थैर्य तसेच जागेचा अभाव अशा अडचणींचा डोंगर उभा असून त्यावर मात करत सराव कसा करायचा, असा प्रश्न पथकांसमोर आहे.
मुंबई, पुण्याप्रमाणेच नाशिकमध्येही सार्वजनिक मिरवणुका, धार्मिक कार्यक्रमांमध्ये उत्साह ओसंडून वाहत असल्याचे दिसत असून त्यामुळेच बोटावर मोजण्याइतकी ढोलताशा पथकांची संख्या आता २० च्या घरात गेली आहे. प्रत्येक ढोल-ताशा पथकात २० ते ३० जण एकत्र येऊन काम करतात. त्यात हौशी कलाकारांसह ढोल ताशाची विशेष आवड असणारे ज्येष्ठही असतात. शंख, ध्वज, झांज, टाळ, ढोल, ताशा आणि टोल या पारंपरिक वाद्यावर पथकाकंडून सफाईदारपणे सराव केला जात आहे. १५ जुलैपासून या संदर्भात सर्वत्र तालमींना अधिक वेग येईल.
ढोल पथकात प्रवेश घेतांना काही पथके वादकाकडून ३०० ते ५०० रुपये प्रवेश शुल्क आकारतात. यातून काही खर्च भागत असला तरी गणेशोत्सव किंवा सार्वजनिक उत्सवातील सुपारीवर सर्व भिस्त असते. या संदर्भातील चित्र हे गणेशोत्सवाच्या सात ते आठ दिवस आधी स्पष्ट होते. कोणत्या मंडळासमोर वाजवायचे, देणगी किती जमा होणार, त्यातच त्या त्या मंडळाच्या आवारात ढोल ने-आण करणे, पथकातील सदस्यांचा नाश्ता, बाहेरगावी असल्यास वादकांचा येण्या-जाण्याचा खर्च, जेवणाची व्यवस्था यातून पथकाकडे किती शिल्लक राहील हे सर्व पथकप्रमुखास पाहावे लागते. अडथळ्यांची ही शर्यत पार करत सराव कसा करायचा, यासाठी प्रत्येक पथक आपल्या पातळीवर पर्याय शोधण्यात सध्या मग्न आहे.शंभुनाद पथकाच्या पवन आढाव १५ जुलैपासून सराव सुरू करण्यात येणार असून वेगवेगळ्या तालांविषयी अभ्यास करण्यात येत असल्याचे सांगितले.
तर सर्वच पथकांचे वादन एकसुरी होत असल्याचे मत अनेकांनी मांडले. या वर्षी ढोल पथकांनीही तालांवर संशोधन करत वादनात विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन ताल आणि लय याच्या मदतीने बरची नृत्य, शिवकालीन मैदानी खेळ यासह सर्व ढोल पथक एकत्र येत नाशिककरांना काही वेगळे देता येईल का, या दृष्टिने सध्या चाचपणी करत आहेत.
जागेचे भाडे १५ हजार
ढोलच्या आवाजाने तयार होणाऱ्या कंपनामुळे शहरात पथकांना जागा देण्यासाठी कोणी तयार नाही. लॉन्सचे महिन्याला १० ते १५ हजार रूपये भाडे आहे. त्यात ढोल मागविणे, जुन्या ढोलमध्ये काही दुरूस्ती करावयाची असल्यास त्यासाठी येणारा खर्च, हे सर्व सांभाळून पथक जिवंत ठेवण्याचा प्रश्न प्रमुखांसमोर आहे. पथकातील बहुतांश मंडळी युवा असल्याने प्रत्येकाचा ताल आणि स्वभाव वेगळा. त्यामुळेच नवे आणि जुने असे अंतर्गत वादही निर्माण होत आहेत. या वादाला वैतागून काही जण बाहेर पडून नवीन पथक तयार करण्यामागे लागतो. त्यामुळे रिकाम्या झालेल्या जागा भरण्यासाठी आधीची पथके कुशल वादकांच्या शोधात, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.
ढोल पथकाविषयी सर्वाना असलेल्या आवडीमुळे पथकात साडेतीन वर्षांच्या बालिकेचाही समावेश असल्याचे नमूद केले. पथकाच्या तालमीत वेगळे प्रयोग करावयाचे असले तरी सध्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. – रुचिका देशपांडे, जिजाऊ महिला ढोल पथक