धुळे : जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या पथकाने शहरात दुधात भेसळ, अनैसर्गिक वास तसेच चव, अस्वच्छता प्रकरणी आठ विक्रेत्यांवर कारवाई केल्याची माहिती जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी डॉ. अमित पाटील यांनी दिली आहे. पथकाने शहरातील शंभर फुटी रोड, वडजाई रोड, दत्तमंदीर देवपूर, वाडीभोकर रोड, गांधी पुतळा येथील दूध डेअरी तसेच दूध पुरवठा फेरीवाले यांचेकडील दूध तपासणी स्वयंचलित उपकरणाद्वारे करण्यात आली. चार विक्रेत्यांच्या दुधात पाण्याची भेसळ, अनैसर्गिक वास-चव, अस्वच्छता आढळून आली.
भेसळ आढळून आलेले सरासरी ७८ लिटर दूध नष्ट करण्यात आले. तसेच शासकीय दूध डेअरी परिसर, भाईजी नगर, सुरतवाला बिल्डींग, चितोड रोड, फाशीपूल चौक, वडजाई रोड येथील दूध डेअरी तसेच दूध पुरवठा फेरीवाले यांचेकडील दुधाची तपासणी करण्यात आली. नऊ विक्रेत्यांच्या दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी चार विक्रेत्यांच्या दुधात भेसळ आढळून आली. भेसळ आढळून आलेले सरासरी एकूण १२२ लिटर दूध नष्ट करण्यात आले.
हेही वाचा : जलजीवन योजनेत जळगाव प्रथम, जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक गावात स्वच्छ जल पुरवठा
दूध मोजण्याची मापे, इलेक्ट्रॉनिक तोलन यंत्र यांची पडताळणी करण्यांत आली असता, काही डेअरीतील वजन-मापे ही मुद्रांकन व पडताळणी उल्लंघन करणारी आढळून आल्याने वैधमापन शास्त्र अधिनियमातंर्गत तीन दूध विक्रेत्यांवर खटले नोंदविण्यात आले. शहरातील देवपूरमधील बालाजी स्वीट दुकानातील दुग्धजन्य पदार्थांचे नमुने भेसळ तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. शहरातील अहिल्यादेवी नगरातील गोपाल डेअरीविरुध्द खाद्यपदार्थ विक्री परवाना नसल्याने खटला नोंदविण्यांत आला आहे.