धुळे – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात सामील झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जाहीर नोटीस बजावली असून, कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, संपाच्या चौथ्या दिवशी संपकऱ्यांनी मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले.
संपामध्ये सहभागी होऊन कार्यालयीन शिस्तभंग करणे ही आपली कृती महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ नुसार असल्यामुळे आपण शिस्तभंग कार्यवाहीसाठी पात्र आहात, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये केंद्र शासनाचे काम नाही वेतन नाही हे धोरण राज्य सरकारनेही अनुसरले असल्याने आपला संप कालावधी विनावेतनसाठी गणला जाईल. तसेच आपण संपामध्ये भाग घेतलेला कालावधी हा सेवेतील खंड कालावधीही गणला जाईल, याची नोंद घ्यावी. नियमित कर्तव्यावर हजर होऊन शासकीय कामकाज सुरळीत पार पडण्यास सहकार्य करावे. वेळेअभावी सर्व संपात सहभागी कर्मचाऱ्यांना ही जाहीर नोटीस काढण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू; घटनास्थळी जाणाऱ्या गस्ती वाहनाला अपघात
हेही वाचा – नाशिक जिल्ह्यात एक हजार ५६ संपकरी महसूल कर्मचाऱ्यांना नोटीस
दरम्यान, शुक्रवारी संपकऱ्यांनी महामोर्चा काढला. ‘एकच मिशन जुनी पेन्शन’, ‘अभी नही तो कभी नही’, ‘पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा अनेकविध घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. खासगी कंपन्यांना सेवाभरतीसाठी झालेल्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याची भूमिका घेत ॲड. सदावर्ते यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याबद्दल महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेचे दहन केले. जेलरोडला मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.