धुळे : धरणगाव येथील व्यापाऱ्यांना १० लाखांना लुटणाऱ्या टोळीला पकडण्यात येथील स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत सात लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किराणा दुकानात काम करणाऱ्या युवकाने आपल्या मित्रांना लुटीची सुपारी दिल्याची माहिती पुढे आली असून १० लाखांची रोकड घेऊन निघालेल्या व्यापाऱ्यासाठी ‘एक घोडा, दो दुल्हे निकल गये’ असा कोडवर्ड वापरण्यात आला होता.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील किशोर पाटील, अतुल काबरा हे दोघे व्यापारी येथील श्रीरत्न ट्रेडिंग दुकानात सोयाबीन विक्रीचे पैसे घेण्यासाठी आले होते. १८ जुलै रोजी सायंकाळी हे दोघे व्यापारी दुकानातून १० लाख ९१ हजार रुपये घेऊन धरणगावकडे दुचाकीने निघाले असता श्रीरत्न ट्रेडिंग या दुकानात कामाला असलेला यश ब्रम्हे (२२, रा.पवननगर, धुळे) याने त्याच्या साथीदारांना भ्रमणध्वनीवर ‘एक घोडा, दो दुल्हे निकल गये’ असा कोडवर्ड वापरुन संदेश पाठविला. यानंतर इतर पाच साथीदारांनी दोघा व्यापाऱ्यांना फागणे गावाजवळ अडवून त्यांच्याशी वेगळ्या कारणावरुन वाद घालत मारहाण केली. यानंतर पाचही जणांनी व्यापाऱ्यांकडील रोकड लुटून नेली. या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा…नाशिक : मद्यतस्करीतील संशयितास तळोद्यातून अटक

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना त्यांना सीसीटीव्हीमधील चित्रणात वर्णनाप्रमाणे दुचाकी आणि त्यावरील दोन युवकांची माहिती मिळाली. त्यानुसार निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह पथकातील सहायक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, हवालदार शशिकांत देवरे, पंकज खैरमोडे, नीलेश पोतदार, गुणवंत पाटील यांनी श्रीरत्न ट्रेडिंग दुकानातील कर्मचारी ब्रम्हे या युवकाला ताब्यात घेतले. त्याने मित्रांच्या सहाय्याने लूट केल्याची कबुली दिली. त्यानंतर कल्पेश वाघ, राहुल वाघ (रा.पवननगर, धुळे), सनी वाडेकर, चंद्रकांत मरसाळे (दोघे रा.मनोहर चित्र मंदिरामागे, धुळे) यांना अटक करण्यात आली असून राहुल नवगिरे (रा.पवननगर, धुळे) हा पसार झाला आहे.