लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धुळे : शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेराव घालण्याआधीच पोलिसांनी शनिवारी सकाळी धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत सनेर यांना धुळ्यातील देवपूर भागातील निवासस्थानातून ताब्यात घेतले. साक्री येथील १० समर्थक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना अटक करून स्थानबद्ध केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी धुळे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दुपारी साक्री तालुक्यातील भाडणे येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मुख्य कार्यक्रम, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान तसेच साक्री उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्यासह विविध विकास कामांचे उदघाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी धुळे तालुक्यातील दुसाने येथे झालेल्या सभेत धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर टीका करुन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील साक्री तालुक्यातील दुसाने महसूल गटातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळाले नसल्याने मुख्यमंत्री शिंदे यांना धुळे जिल्हा दौऱ्यावर येताच घेराव घालून जाब विचारण्यात येईल, असा इशारा दिला होता.

आणखी वाचा-Samruddhhi Highway : समृद्धी महामार्गावरील ८ किमीच्या बोगद्याची खासियत, इगतपुरी ते कसारा अंतर अवघ्या १० मिनिटांत कापलं जाणार

राज्यातील इतर तालुक्यांना अनुदान मिळाले असताना साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय का, असा सनेर यांचा प्रश्न आहे. २०१८-१९ मधील दुष्काळी अनुदानदेखील अजूनही प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांमधील असंतोष यावेळी उफाळून आला. १० ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या साक्री दौर्‍यात शेतकरी त्यांना घेराव घालतील, असा निर्धार यावेळी करण्यात आला होता. तथापि सकाळी साडेसात वाजता पोलिसांनी सनेर यांना त्यांच्या देवपूर येथील राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. सनेर यांना शिरपूर येथे तर साक्रीतून ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोनगीर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhule district congress president shyamkant saner was detained by the police from his residence in devpur mrj