धुळे : नैसर्गिक मृत्यू झाला असताना केवळ विम्याचे पैसे मिळावेत, या उद्देशाने अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आल्याचे धुळे जिल्ह्यात पोलिसांनी उघडकीस आणले. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्याजवळील प्रकाशा येथील मनोज झिंगाभाई (३१) असे नैसर्गिकपणे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. २६ ऑक्टोबरच्या रात्री एक ते मध्यरात्री पहाटे साडेतीन या वेळेत शिंदखेडा तालुक्यातील सुकवद गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आशापुरी मंदिरापुढे साधारणपणे एक किलोमीटरवर अपघात घडल्याचे भासविण्यात आले.
हेही वाचा…द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या महिलेस दिल्लीत अटक
ब
मनोज झिंगाभोई यांचा नैसर्गिक मृत्यू झाला असताना ईश्वर परदेशीने विम्याचे पैसे मिळावेत म्हणून मनोज यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव रचला. यासाठी ईश्वर हा स्वतः या अपघातातील जखमी म्हणून उपचारार्थ शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात पोहोचला. जखमी म्हणून आलेल्या परदेशीने आपण ज्या अपघातात जखमी झालो, त्याच अपघातात मनोज झिंगाभोई यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील संबंधित कर्मचाऱ्याला सांगितले. तत्पूर्वी मनोजचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे पुरावे नष्ट करण्याच्या अनुषंगाने संशयितांनी प्रयत्न केले. ईश्वरने शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्याला खोटी माहिती दिल्याचे बिंग फुटल्यावर हे प्रकरण पोलिसांत पोहोचले. पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी केल्यावर या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून रेखा झिंगाभोई, गणेश भोई, विशालभाई इंद्रेकर, राहुल परदेशी आणि ईश्वर परदेशी यांच्याविरुध्द शिंदखेडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी पंकज कुलकर्णी यांनी तक्रार दिली. या तक्रारीवरुन शिंदखेडा पोलीस ठाण्यात सर्व पाचही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.