धुळे : हरलेल्या महिला आणि बालकांचा शोध घेण्यासाठी धुळे जिल्हा पोलिसांतर्फे महिनाभर “ऑपरेशन शोध” ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या तीनही उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या परिवेक्षणाखाली उपविभागनिहाय तीन  पथके तयार करण्यात आली आहेत.

राज्यातील हरवलेल्या महिलांबाबत विशेषतः एक वर्ष उलटून गेलेल्या हरवलेल्या महिलांच्या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालुन महिला आणि बालकांचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत देण्यात आले होते.

त्याअनुषंगाने अपर महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाने १७ एप्रिल ते १५ मे या कालावधीत प्रत्येक पोलीस ठाणे आणि पोलीस उपविभाग स्तरावर हरवलेल्या महिला आणि बालकांचा शोध घेण्यासाठी “ऑपरेशन शोध” ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यातील तीनही उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या परिवेक्षणाखाली उपविभागनिहाय तीन पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक असून एक सहायक पोलीस उपनिरीक्षक किंवा हवालदार आणि एक पुरुष, एक महिला पोलीस अंमलदार यांची नियुक्त करण्यात आली आहे. ही पथके धुळे जिल्ह्यातील हरवलेल्या महिला व बालकांचा शोध घेणार आहेत.

या मोहिमेत महिला व बालकांसाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्था, बाल कल्याण समिती, महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल सुरक्षा कक्ष यांचा सहभाग असणार आहे. शोध मोहीम कालावधीत रेल्वे स्थानक, बस स्थानक, पर्यटन स्थळ, धार्मिक स्थळ इत्यादी ठिकाणी फिरणाऱ्या

अल्पवयीन बालकांची माहिती घेण्यात येणार आहे. भीक मागणारे, वीटभट्टी, हॉटेल, अशा ठिकाणी बेकायदेशीरपणे काम करणारी अल्पवयीन बालके अशा बालकांना हरवलेली बालके समजून, फोटो घेवून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

धुळे जिल्हा पोलीस विभागातर्फे सर्व शासकीय व अर्धशासकीय संस्था, कार्यालय यांचा सहभाग आणि प्रयत्नातुन हरवलेल्या महिला व बालकांचा शोध घेण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक हे शोध मोहिमेचा वेळोवेळी आढावा घेणार आहेत.

हरवलेल्या महिला आणि बालके घरी आले असल्यास नजिकचे पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष अगर फोनद्वारे संपर्क करुन माहिती द्यावी. अगर पोलीस पाटील यांना माहिती द्यावी. हरवलेल्या महिला व बालकांबाबत माहिती असल्यास पोलीस विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.