धुळे – पंजाबचा व्यापारी माल घेऊन महामार्गाने निघतो काय, धुळ्याजवळ पोलीसच जीएसटी अधिकारी असल्याचे भासवून त्याला लुटतात काय, व्यापाऱ्याने तक्रार केल्यावर धुळे पोलिसांकडून प्रकरण गांभीर्याने घेऊन लूट करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात येते काय आणि त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने धुळे पोलिसांकडून पंजाबच्या व्यापाऱ्यास त्यांचे एक लाख २० हजार रुपये परत केले जातात काय…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्व प्रकार चित्रपटातील कथेप्रमाणे. काश्मीरसिंग बाजवा (रा.पटियाला, पंजाब) या व्यापाऱ्याची मालमोटार पटियाला येथून पुणे येथे जात असताना १७ ऑक्टोबर २०२३ रोजी सहायक पोलीस उपनिरीक्षक बिपीन पाटील, त्यांची बहीण स्वाती पाटील, हवालदार इमरान शेख आणि खासगी व्यक्ती विनय बागूल उर्फ बबल्या यांनी मुंबई- आग्रा महामार्गावर मालमोटार अडवली. त्यांनी जीएसटी अधिकारी असल्याचे भासवून मोटारीतील मालाच्या कागदपत्रांची तपासणी केली. कागदपत्रांमध्ये चुका असून जीएसटीच्या दंडाची रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. तडजोडीअंती चौघांनी बाजवा यांच्याकडून एक लाख ३० हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन स्वीकारले. याबाबत बाजवा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चौघांविरुद्ध आझाद नगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा – परीक्षा काळातच नाशिकची सिटीलिंक बससेवा पुन्हा ठप्प

हेही वाचा – शिरपूर उपविभागीय अधिकाऱ्याचा वाहन चालक लाच प्रकरणात ताब्यात

सहायक अधीक्षक ॠषीकेश रेड्डी यांनी तपास करुन चौघांना अटक केली. तपासात चौघांनी जीएसटी अधिकारी असल्याचे भासवून विविध व्यापाऱ्यांना फसवल्याचे उघड झाले. हा आकडा सुमारे चार कोटी रुपयांपर्यंत गेला. या प्रकरणात रेड्डी यांनी संशयितांशी संबंधित १६ बँक खाती गोठवली. यातील बागूल उर्फ बबल्या याच्या बँक खात्यात सुमारे ७१ लाखांची रोकड आढळून आली. या प्रकरणात संशयितांकडून फसवणुकीच्या एक लाख ३० हजार रुपयांपैकी एक लाख २० हजार रुपये हस्तगत करण्यात आले. रक्कम धुळे न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते बाजवा यांना देण्यात आली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhule fraud with trader by pretending to be gst officer stolen amount was returned ssb