धुळे शहरातील नामचीन गुंड आणि दरोडेखोर रफियोद्दीन शेख उर्फ गुड्डयाची मंगळवारी सकाळी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. कराचीवाला खुंटाजवळील गोपाल टी हाऊस समोर हा थरार घडला. इंडिका कार आणि दुचाकीवरुन आलेल्या ८ ते १० जणांच्या टोळक्याने गुड्ड्याला भररस्त्यात मारहाण करुन त्याची हत्या केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास गोपाल टी हाऊस या चहाच्या दुकानात गुड्डया चहा पिण्यासाठी आला होता. दुकानात चहा पित असताना एक इंडिका कार तिथे येऊन थांबली. त्यामागोमाग दुचाकीवर काही तरुणही तिथे पोहोचले. या सर्वांनी गुड्ड्याला मारहाण केली. हल्लेखोरांच्या हाती तलवार, कोयतादेखील होता. यातील एका हल्लेखोराने गुड्ड्यावर तलवारने वार केले. तर दुसऱ्याने गावठी पिस्तूलने त्याच्यावर गोळीबार केला. यात जखमी झालेला गुड्ड्या रस्त्यावर जागीच कोसळला. गुड्ड्याची भररस्त्यात हत्या झाल्याची माहिती समजताच पोलिसांचे पथकही घटनास्थळी धाखल झाले. पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, शहर पोलिस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. चहाच्या टपरीजवळील एका दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हत्याकांडाचा थरारक प्रकार कैद झाला आहे. या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. खून करणार्‍या संशयीतांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून विक्की गोयर, शाम गोयर, पापा गोयर, राजा भद्रा, भुर्‍या अशी या संशयितांची नावे आहेत. हल्लेखोरांची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरुपाचीच आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची ५ पथके तयार करुन रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक एम.रामकुमार यांनी दिली. टोळीयुद्धातूनच ही हत्या झाल्याचा अंदाज आहे.

मनपा जळीतकांडासह गुड्डयावर एकूण ३५ गुन्हे
धुळ्यातील देवपूर परिसरातील रहिवासी असलेला रफियोद्दीन शेख उर्फ गुड्डया हा सुरुवातीला छोट्या मोठ्या चोर्‍या करायचा. यानंतर तो सराईत चोरटा झाला. त्याला अनेक वेळा पोलिसांनी अटक केली होती. मात्र शिताफिने कायद्याचा वापर करीत तो बाहेर यायचा. धुळे महापालिकेच्या वसुली विभागाचे शाळा क्र. १ मधील दस्तावेज रेकॉर्ड त्याने मनपातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या इशार्‍यावरुन सुपारी घेवून जाळल्याचे आरोप त्याच्यावर होते. या प्रकरणात गुड्डयाला अटक देखील झाली होती. त्या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून त्याच्यावर खटलाही चालू आहे. त्याशिवाय साक्रीरोडवर नगरच्या व्यापार्‍याचा खून, स्वतःच्या साथीदारावर गोळ्या झाडण्याचा प्रकार, कोपरगाव, मनमाड, नाशिक आदी ठिकाणी दरोडे, चोर्‍या ब्लॅकमेलिंग असे एकुण ३५ गुन्हे गुड्डयावर दाखल होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhule gangwar goon killed in firing by another gang murder caught on cctv