लोकसत्ता वार्ताहर
मनमाड: प्रति गोदावरी एक्स्प्रेस म्हणून धावणाऱ्या दादर-मनमाड एक्स्प्रेसला आकर्षक रंगसंगतीचे एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत. या डब्यामुळे गाडीचा चेहरा-मोहरा बदलणार असून प्रवाशांना बसल्या जागेवरून बाहेरील निसर्गसौंदर्य न्याहाळता येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास अधिक आल्हाददायक आणि सुखकर होणार आहे.
मध्य रेल्वेच्या दादर-धुळे आणि दादर-मनमाड एक्स्प्रेसला २१ जुलैपासून इंटीग्रल कोच फॅक्टरी प्रकारातील डब्यांऐवजी लिके होल्फ मन बुश (एलएचबी) प्रकारचे १५ डबे जोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर गाडी क्रमांक ०१०६५/६६ दादर-धुळे एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक ०२१०१/०२ दादर-मनमाड एक्स्प्रेसची रंगसंगतीही बदलण्यात येणार असून या गाड्या भविष्यात निळ्याऐवजी लाल करड्या रंगसंगतीत दिसणार आहेत.
हेही वाचा… मालेगावात नव्या मालमत्तांवर वाढीव कराचा भार; राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप
दरम्यान, मनमाड आणि नाशिक जिल्ह्यांतील हजारोंवर प्रवाशांची आडती गाडी असलेली मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत आणि त्याच वेळेत पुन्हा सुरू करावी, ही प्रवाश्यांची मागणी अजूनही कायम आहे.