धुळे – धुळेकराना मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या आणि नागरिकांकडून दुप्पट, तिप्पट घरपट्टी आकारणाऱ्या अकार्यक्षम महानगर पालिकेविरोधात तीन जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा एमआयएमचे आमदार फारुक शाह यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, याआधी सत्ताधारी भाजपाच्या विद्यमान आणि माजी महापौरांसह उपमहापौरांवरही पालिका प्रशासनावरोधात उपोषणाचा इशारा देण्याची नामुष्की ओढावली होती.
हेही वाचा – नाशिक: लाचप्रकरणी दिंडोरी प्रांताधिकारी नीलेश अपार यांच्याविरुध्द गुन्हा
या संदर्भात आमदार शाह यांनी भूमिका मांडली आहे. पालिका जनतेला मूलभूत सुविधा देण्यात अकार्यक्षम ठरली आहे. कुठल्याच प्रकारे सुविधा न देता पालिका प्रशासनाने घरपट्टी आकारणीत दुप्पट-तिप्पट वाढ केली आहे. शहरालगत पाण्याचे स्त्रोत असूनही नागरिकांना नियमित पाणी दिले जात नाही. शहरातील काही भागांत १० ते ११ दिवसांनी पाणी दिले जाते. अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेमार्फत एक दिवसाआड पाणी देण्याचे आश्वासनही हवेत विरले आहे. शहरातील प्रमुख चौकात कचऱ्यांचे ढीग साचले आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर साथरोग नियंत्रणाबाबत मनपाची कुठलीच तयारी नाही. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न अत्यंत बिकट झालेला आहे. सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीसाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदारांना पैसे मिळाले नसल्याने आठ-दहा दिवसांपासून शहरातील सर्व शौचालये बंद आहेत. यासंदर्भात नागरिकांनी तक्रार केली असता वैयक्तिक शौचालयासाठी निधी देण्यात येईल, असे मनपा सांगते. यामुळे वैयक्तिक शौचालय बांधेपर्यंत नागरिकांनी काय करावे, असा प्रश्नही आमदार शाह यांनी उपस्थित केला आहे.