धुळे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, पोलीस सतर्क झाले असून दहशत माजविण्याच्या उद्देशाने तलवारी आणि चॉपर घेऊन फिरणाऱ्या दोघांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चार तलवारी आणि चॉपर अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. समीर खाटीक (१९) आणि अयान मणियार (१९, दोघे रा.शंभर फुटीरोड, अलहेरा शाळेजवळ, धुळे) अशी संशयितांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधातील आंदोलनात बैलगाडी, घोडेही रस्त्यावर

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे बुध‌वारी ही  कारवाई झाली. धुळे शहरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने काहीजण तलवारी, चॉपर बाळगत असल्याची चर्चा होती. या अनुषंगाने पोलिसांनी माहिती काढली असता शंभर फुटी रस्त्यावरील सुमय्या हॉलजवळ संशयित जमत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी धाव घेत दोन संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता दोघांनीही आपल्याकडे हत्यारे असल्याची कबुली दिली.

हेही वाचा >>> नाशिक: लाचखोर अधिकाऱ्याला सीबीआय कोठडी

पोलीस पथक संशयितांच्या घरी पोहोचल्यावर दोघांनीही त्यांच्याकडील चार तलवारी आणि चॉपर अशी हत्यारे पोलिसांना काढून दिली. पंचासमक्ष दोन्ही संशयितांसह साडेचार हजार रुपयांची हत्यारे पोलिसांनी ताब्यात घेतली. खाटीक आणि मणियारविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात हत्यार बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया लगेचच हाती घेण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहायक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पंकज खैरमोडे, प्रशांत चौधरी हर्षल चौधरी, जगदीश सूर्यवंशी, मयूर पाटील यांनी ही कारवाई केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhule police arrest two goons for carrying swords and choppers with intention to create terror zws