धुळे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयात सकाळी ७० हून अधिक गुन्हेगारांनी हजेरी लावली. यावेळी शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासह शांतता अबाधित ठेवण्याच्या कठोर सूचना त्यांना देण्यात आल्या. कोणी शांतताभंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना चांगले नागरिक बनण्याची शपथ दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह शहरात शांतता अबाधित राहावी, कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अधीक्षक धिवरे यांनी जिल्ह्यासह शहरातील नोंदीवरील गुन्हेगारांना अधीक्षक कार्यालयात हजर करण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार सकाळी अधीक्षक कार्यालयात ७० हून अधिक गुन्हेगारांनी हजेरी लावली. याप्रसंगी अप्पर अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, निरीक्षक धीरज महाजन, निरीक्षक प्रमोद पाटील उपस्थित होते.
हेही वाचा…नाशिक: मुख्यमंत्री मार्गस्थ अन् वीज गायब
यावेळी गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. कोणीही मोबाईलद्वारे समाजमाध्यमात आक्षेपार्ह चित्रफित अथवा शांतता भंग होईल, असे संदेश पाठवू नये, कोणीही दादागिरी, हाणामाऱ्या, भाईगिरी केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला. यावेळी उपस्थितांना आम्ही भांडण करणार नाहीत, शांततेचे पालन करुन, चांगले नागरिक बनू, अशी शपथही दिली गेली.