धुळे: जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शुक्रवारी कामावर उशिरा येणाऱ्या १० कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर थांबवून आपल्या प्रशासकीय कामकाजाचा पहिला धक्का दिला. कार्यालयीन वेळेचे महत्व अधोरेखीत करतांना त्यांनी सामान्यांच्या पोलीस प्रशासनाकडून दैनंदिन अपेक्षांची पूर्तता करण्यावर विशेष भर दिला आहे.
अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, वाचक शाखा,आस्थापना विभाग यांसह अनेक शाखा आहेत. हा प्रत्येक विभाग स्वतंत्र असला तरी तो जिल्हा अधीक्षकांच्याच अधिपत्याखाली आहे. यापैकी सामान्यांसाठी दैनंदिन सेवा उपलब्ध करून देणाऱ्या विभागातील प्रमुखांसह अन्य कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळेत उपस्थिती अनिवार्य आहे. यामुळे अधीक्षक धिवरे यांनी शुक्रवारी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे मोर्चा वळवला.
हेही वाचा… पूल खचल्याने मनमाडमध्ये वाहतूक कोंडीचे संकट; स्थानिकांसह प्रवाश्यांचे हाल
कार्यालयातील दैनंदिन कामकाज वेळेत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी यापूर्वीच संबंधितांना दिले होते. असे असतांना अनेकजण कार्यालयात उशिरा येत असून सायंकाळी लवकर घरी निघून जातात, असे अधीक्षक धिवरे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी शुक्रवारी अचानक उशिरा येणाऱ्यांसाठी कार्यालयाचे दरवाजे तूर्त बंद करण्याचे आदेश दिले. बाहेरच थांबविण्यात आल्याने उशिरा येणारे कर्मचारी बुचकळ्यात पडले. विशेषतः महिला कर्मचारी अधिक धास्तावल्या. ओशाळवाणे वाटत असले, तरी मुख्य प्रवेशद्वारासमोर घुटमळण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही. नंतर कडक शब्दांत समज देऊन त्यांना कामावर हजर होण्याचा आदेश देण्यात आला.