Dhule Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यातील धुळे शहर हे उत्तर पश्चिम महाराष्ट्रात वसलेले आहे. पांजरा नदीच्या काठावर वसलेल्या या शहरात एमआयडीसी, आरटीओ आणि एमटीडीसीचे प्रादेशिक मुख्यालय आहे. आदिशक्ती एकविरा आणि स्वामीनारायण मंदिरामुळे हे शहर प्रसिद्ध आहे. राज्यभरात कापड, खाद्यतेल, माहिती तंत्रज्ञान आणि यंत्रमागाचे आगामी केंद्र म्हणून धुळे शहर उदयास येत आहे. हे शहर एनएच -३, एनएच – ६ आणि एनएच २११ या तीन राष्ट्रीय महामार्गांना जोडून असल्याने त्यास धोरणात्मक फायदा झाला आहे. शाह फारुक अनवर हे धुळे शहराचे आमदार आहेत.

शाह फारुक अनवर हे एआयएमआयएम पक्षाचे नेते आहेत. २०१९ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ते धुळे शहर मतदारसंघातून निवडून आले होते. शाह हे २०१३ ते २०१७ पर्यंत राष्ट्रवादीबरोबर होते. नंतर २०१९ मध्ये ते एआयएमआयएम पक्षाचे सदस्य झाले.

धुळे हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु भाजप आणि एमआयएमने त्यास कडवे आव्हान दिले आहे. २०१९ च्या निवडणुकीत धुळे शहर आणि मालेगाव मध्य या दोन विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार निवडून आले होते. धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेस, मालेगाव बाह्य शिवसेना, शिंदखेडा आणि बागलाण मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून आला होता.

धुळे शहरातील अल्पसंख्याकांची मते हे विधानसभा निकालावर प्रभाव पाडू शकतात. मुस्लीम मतांचे विभाजन होऊ नये, हे मोठे आव्हान शाह फारुक अनवर यांच्यापुढे असेल. निवडणुकीत भाजप, काँग्रेसचे आव्हान असेलच, तसेच वाढती बेरोजगारी, औद्योगिक मागसलेपण, आदी समस्याही निवडणुकीच्या तोंडावर अनवर यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतात.