धुळे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांची जळगाव येथे बदली झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही आनंदोत्सव साजरा केला. जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनिता सोनवणे व ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी जिल्हा परिषद आवारात पेढे वाटले. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र शिंपडले. ही बदली नसून त्यांची हकालपट्टी आहे, अशी प्रतिक्रिया सोनवणे यांनी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ शुभम गुप्ता यांच्याविरूद्ध सत्ताधारी आणि विरोधी गटातील ५१ सदस्यांनी अविश्‍वास ठराव आणला होता. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गुप्ता यांची जळगाव जिल्हा परिषदेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर विशाल नरवाडे यांची धुळे जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती झाली. ही माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य सुनिता सोनवणे आणि ठाकरे गटाचे नेते शानाभाऊ सोनवणे यांनी बुधवारी जिल्हा परिषदेत पेढे वाटून आनंद साजरा केला.

हेही वाचा…पुष्पा चित्रपटातील आयडियाचा धुळे जिल्ह्यात असा वापर

जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र शिंपडून वास्तू पवित करत असल्याचे सांगितले. आम्ही शेतकरी आणि ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी आंदोलने केली असताना आमच्याविरुध्द त्यांनी रात्री दोन वाजता खोटे गुन्हे दाखल केले. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमच्याविरुध्द कितीही गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही. आम्ही जनतेची कामे करतच राहणार, असे सोनवणे यांनी नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhule zilla parishad ceo shubham gupta transfer zp members celebrated psg