धुळे : शहरात पिण्याच्या पाण्याचा किमान दोन वर्ष पुरेल इतका साठा असतांनाही शहरातील नागरिकांना वर्षभर १० ते १२ दिवसाआड पाणी तेही अत्यंत कमी दाबाने मिळत आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून धुळेकरांना पाण्यासंदर्भात दररोज वेगवेगळी आश्वासने देण्यात येत असून १० दिवसाआड देखील पाणी देण्यास सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासन असमर्थ ठरली असल्याने धुळेकरांमध्ये असंतोष आहे. भाजप आणि मनपा प्रच्सनाच्या निषेधार्थ ठाकरे गट महानगर व महिला आघाडीच्या वतीने प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.
अक्कलपाङा पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होण्यास अजून अनेक महिने लागतील, हे वास्तव असतांना अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेच्या कामावर खा. डाॅ. सुभाष भामरे हे दर दोन, चार दिवसात पाहणी दौरे करत असून धुळेकरांना दररोज भूलथापा देत असल्याची टीका ठाकरे गटाने केली आहे. धुळे शहरासाठी किमान दोन वर्षे दररोज पाणीपुरवठा केला तरी पाणी संपणार नाही, इतपत साठा तापी पाणीपुरवठा, नकाणे, हरण्यामाळ, डेडरगाव या जलस्रोतात आजमितीस उपलब्ध आहे.
शहरातील देवपूर, मिल परिसर, साक्रीरोड, पेठ, आझाद नगर या भागात १२ दिवसानंतरही पाणी येत नाही. याला मनपाचा पाणीपुरवठा विभाग, तेथील अधिकारी, नव्याने नेमलेले अभियंता कारणीभूत असून योग्य नियोजन करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरले आहे. धुळे मनपाचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त, मुख्य अभियंता यांच्या विरोधातही ठाकरे गटाने आरोप केले आहेत. मनपा प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर चार वर्षांत अंकुश लावण्यात भाजपचे महापौर ,नगरसेवक, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांना यश आलेले नाही, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे. धुळे महानगर ठाकरे गट आणि महिला आघाडीच्या वतीने मनपा प्रशासन व पाणीपुरवठा विभाग यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. या प्रेतयात्रेवर हंडे, बादली तसेच कळशी असे साहित्य ठेवण्यात आले होते.
हेही वाचा >>> जिल्ह्यात कापसावरून संघर्ष, शिंगाडे मोर्चे काढणारे दोन्ही मंत्री गेले कुठे?
प्रेतयात्रेची सुरुवात जिल्हा मध्यवर्ती कार्यालयापासून करुन राणा प्रताप चौक, फुलवाला चौक, कराचीवाला खुंट, पोलीस चौकी, जे.बी.रोडमार्गे नविन महानगरपालिका येथे संपली. या ठिकाणी मनपा प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व मनपाच्या नावाने बोंब ठोकण्यात आली. या आंदोलनात सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील ङॉ.सुशील महाजन, महिला आघाडीच्या हेमाताई हेमाडे, डाॅ. जयश्री महाजन आदी उपस्थित होते.