विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात संवाद कायम राहावा, यासाठी शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ‘संवाद पेटी’ उपक्रमास कालांतराने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्य़ातील सर्वच शाळांमध्ये संवाद पेटी बसविली असून या उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी स्वागत करीत या माध्यमातून तक्रारी मांडण्यास व्यासपीठ उपलब्ध झाल्याबाबत समाधान व्यक्त केले. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात संबंधित समितीसमोर शाळेतील पेटय़ा उघडण्यात आल्या. मात्र त्यात तक्रारींऐवजी बहुसंख्येने आभारपत्रांचा समावेश होता. हजारो शाळांतील एकाही विद्यार्थ्यांची शिक्षण विभागाकडे तक्रार प्राप्त झालेली नाही. या स्थितीमुळे उपक्रमाविषयी साशंकता निर्माण झाली आहे.

राज्य शासनाने नव्या शैक्षणिक वर्षांचा श्रीगणेशा संवाद पेटी उपक्रमाद्वारे करण्याचे निश्चित केले. मात्र उन्हाळी सुटी तसेच अन्य काही कारणांस्तव जिल्ह्य़ात शाळा सुरू झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी हा उपक्रम सुरू झाला. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षक, शाळा, सभोवताली असणाऱ्या अन्य काही उपद्रवी घटकांकडून होणारा त्रास यासह अभ्यासातील समस्या, शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी असणारे वर्तन आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी व्यक्त व्हावे, अशी अपेक्षा आहे. मात्र उपक्रमाचा हेतू आणि मूळ उद्देश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात शिक्षण विभाग अपयशी ठरला. पेटय़ा बसल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवडय़ात शिक्षणाधिकारी व समिती सदस्यांच्या उपस्थितीत त्या उघडण्यात आल्या. पेटीत असंख्य पत्रे प्राप्त झाली असली तरी त्यात कोणत्याही विद्यार्थ्यांने किंवा विद्यार्थिनीने तक्रार केलेली नाही. हा उपक्रम चांगला असून त्याचे स्वागत आहे. आम्हाला व्यक्त होण्याची संधी दिली याबद्दल शाळा प्रशासनाचे आभार.. अशा स्वरूपाची पत्रे पेटीतून मिळत आहेत.

वास्तविक उपक्रमाविषयी प्रबोधन करण्यात शाळा, शिक्षण विभाग कमी पडला. मुलांना आजही या उपक्रमाबद्दल फारसा विश्वास वाटत नाही किंवा शाळा तसेच व्यवस्थापन, शिक्षक यांच्याविषयी त्यांच्या मनात भीती असल्याने ते मोकळेपणाने बोलू शकत नाही. आपल्याला नंतर शिक्षा होईल अशा अनामिक भीतीने मुले पुढे येत नसल्याचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरराव यांनी सांगितले. यासाठी लवकरच सर्व शाळांना पालक  व विद्यार्थ्यांना तक्रार करताना विद्यार्थ्यांचे नाव बंधनकारक नाही, अशी सूचना करण्यात येणार आहे. पालकांनाही या उपक्रमाची माहिती देत तो परिणामकारक कसा करता येईल या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत.

Story img Loader