केंद्राच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानातील अंतिम टप्प्यात नाशिकचा समावेश होण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून या प्रयत्नांमध्ये नाशिककरांना सहभागी करून घेण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले आहे. या स्पर्धामध्ये स्मार्ट सिटी बोधचिन्ह, स्मार्ट विधान, उत्कृष्ट सूचना व संकल्पना यांचा समावेश आहे. या स्पर्धासाठी रोख स्वरूपात पारितोषिके देण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी त्यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
नाशिककरांकडून वेगवेगळ्या सूचना व संकल्पना महानगरपालिकेस मिळाव्या यासाठी उत्कृष्ट सूचना व संकल्पना देणाऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसाची स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १६ नोव्हेंबपर्यंत पालिकेच्या संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या संकल्पना, सूचना सादर करता येतील. या स्पर्धेत वैयक्तिक-सामूहिक अथवा संस्थांमार्फत सहभाग नोंदविता येईल. उत्कृष्ट सूचना व संकल्पनेसाठी प्रथम पारितोषिक ५० हजार, द्वितीय ३० हजार व तृतीय पारितोषिक २० हजार रुपये तसेच उत्तेजनार्थ पाच पारितोषिकांसाठी प्रत्येकी १० हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
याशिवाय ‘स्मार्ट सिटी लोगो (बोधचिन्ह)’ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. उत्कृष्ट बोधचिन्हासाठी ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. या स्पर्धेसाठीही १६ नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. स्पर्धेचा निकाल १७ नोव्हेंबर रोजी घोषित केला जाणार आहे. या स्पर्धेविषयी अधिक माहिती ७७१५९१०००९ या क्रमांकावर मिळू शकेल.
पालिकेमार्फत ‘स्मार्ट सिटी व्हिजन स्टेटमेंट’ म्हणजे सुंदर नाशिकसाठी मत मांडण्याची स्पर्धा ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक ७५००, द्वितीय पाच हजार आणि तृतीय २५०० रुपये रकमेचे बक्षीस देण्यात येईल. ही स्पर्धा सर्वासाठी खुली असून मत मांडण्याची अंतिम मुदत १० नोव्हेंबपर्यंत आहे. या स्पर्धेसाठी अधिकाधिक १०० शब्दांची मर्यादा असून मराठी किंवा इंग्रजी भाषेतून मत मांडावे. आपले मत समक्ष, पोस्टाद्वारे नाशिक महानगरपालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक ४२२ ००२ येथे अथवा ई-मेलवर पाठवावे. लिफाफ्यावर नाशिक स्मार्ट सिटी व्हिजन स्टेटमेंट असा उल्लेख करावा. या स्पर्धेची अधिक माहिती ९४२३१७९१४१ या क्रमांकावर मिळू शकेल. अधिकाधिक नाशिककरांनी या स्पर्धामध्ये सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Story img Loader