मालेगाव : जम्मू-काश्मिरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेले दिलीप जयराम देसले हे मूळचे मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील रहिवासी होते. नोकरीनिमित्त ३५ वर्षांपासून त्यांचे पनवेल येथे वास्तव्य होते. पत्नी उषासह ते पर्यटनासाठी गेले असता दहशतवाद्यांच्या हल्ल्यात त्यांचा बळी गेला.
माळमाथ्यावरील झोडगे गावात दिलीप देसले यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांचे थोरले बंधू काशीराम देसले हे गावी वडिलांबरोबर शेती व्यवसाय करतात. द्वितीय क्रमांकाचे भाऊ भीमराव हे पनवेल येथे एका कंपनीत नोकरीस आहेत. कोरडवाहू तसेच मर्यादित क्षेत्र असलेल्या शेती व्यवसायातून दोन भावांचा उदरनिर्वाह होणे अवघड असल्याने लग्न झाल्यावर दिलीप हे देखील भावाकडे पनवेल येथे नोकरीसाठी गेले. तेथे एका कंपनीत त्यांना रोजगार मिळाला. त्यामुळे त्यांचे कुटुंब तिथेच स्थायिक झाले.
काही दिवसांपूर्वी दिलीप देसले हे सेवानिवृत्त झाले. उन्हाळ्याच्या दिवसात पनवेलमधील काही मित्रमंडळींनी जम्मू-काश्मिरला पर्यटनासाठी जाण्याचा बेत आखला. त्यानुसार तीन,चार दिवसांपूर्वीच देसले हे पत्नी उषासह पर्यटनाला गेले होते. पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी तसेच अन्य मित्रमंडळी या हल्ल्यात वाचले. देसले यांना मुलगा आणि दोन मुली आहेत. मुलगा पुणे येथे एका कंपनीत नोकरीस आहे. या हल्ल्यात वडील मारले गेल्याची माहिती सर्वप्रथम त्यालाच समजली. देसले यांच्या आई-वडिलांचे निधन झाले असून गावी थोरले बंधू काशीराम शेती व्यवसाय करतात.
काही दिवसांपूर्वी आपल्या मूळ गावी भावाच्या घराशेजारी दिलीप यांनी घर बांधले होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून ते ओळखले जात होते. निवृत्तीनंतर त्यांचा मूळ गावी संपर्क वाढला होता. पहेलगाम हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समजल्यावर झोडगे परिसरात शोककळा पसरली. पनवेल येथे अंत्यविधीसाठी गावकरी आणि नातेवाईक मालेगाव येथून रवाना झाले.
गुरुवारी मालेगाव बंद
पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा सर्व स्तरातून तसेच विविध संघटनांकडून तीव्र स्वरूपाचा निषेध करण्यात येत आहे. शिवसेनेने (एकनाथ शिंदे) यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून केंद्र शासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सचिव मौलाना उमरेन रहेमानी यांनी या हल्ल्याची कठोर शब्दांत निर्भत्सना केली. मालेगाव वकील संघटनेच्या बैठकीत या हल्ल्याचा निषेध करून मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान, या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध संघटनांकडून गुरुवारी मालेगाव बंदचे आयोजन करण्यात आले आहे.