नाशिक: महाविद्यालयीन वार्षिक क्रीडा महोत्सवात धावणे, भालाफेक स्पर्धेत नेहमी दुसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारू शकलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांनी दिंडोरी लोकसभा निवडणुकीतील राजकीय स्पर्धेत मात्र थेट अग्रस्थान गाठले. भाजपच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या दिग्गज उमेदवारास एक लाखहून अधिकच्या मताधिक्क्याने या सामान्य शिक्षकाने पराभूत केल्याने सध्या त्यांच्या या विजयाची सर्वत्र चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिंडोरी लोकसभेची निवडणूक अनेकार्थाने वेगळी ठरली. एकिकडे राजकीय घराणेशाहीचा वारसा, केंद्रातील मंत्रिपद, महायुतीचा संपूर्ण मतदारसंघावर प्रभाव, पक्षाची बलाढ्य यंत्रणा, साधन-सामग्रीची रेलचेल तर, दुसरीकडे सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती, निवडणूक लढविण्यासाठी निधीची चणचण, पक्षाचा एकही आमदार नसणे. या विपरित परिस्थितीत डॉक्टर विरुद्ध शिक्षक, अशी ही लढाई झाली. लोकसभेच्या मैदानात उतरलेले भगरे हे पहिल्याच प्रयत्नात विजयी झाले. भाजपच्या दिग्गज मंत्र्यास त्यांनी पराभूत केले. सामान्य शिक्षकाला जनतेतून केवळ भरभरून मते मिळाली नाही तर, ज्या ज्या गावात ते प्रचाराला गेले, तिथे झोळीत शक्य तितका निधी संकलित करून दिला गेला. कुणी वाहने उपलब्ध केली तर, कुणी प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेट्ये, माजी आमदार अनिल कदम व स्थानिक कार्यकर्त्यांच्या सोबतीने भगरे मास्तरांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. निवडणूक काळात सकाळी सुरू होणारा प्रचार रात्री उशिरापर्यंत चालायचा. गावांमध्ये लोक रात्री बारा वाजेपर्यंत वाट बघायचे. नांदगावमधील वेळगाव येथे रात्री दोन वाजता ते भेटीला गेले. इतक्या रात्री फटाके फोडून स्वागत झाले होते. ही निवडणूक लोकांनी हाती घेतली होती, हे भगरे आवर्जुन सांगतात.

हेही वाचा : उद्धव ठाकरे लवकरच नाशिक दौऱ्यावर – राजाभाऊ वाजे यांची मातोश्रीवर चर्चा

दिंडोरीतील पाराशरी नदीकाठावरील गोंडेगाव हे भगरे यांचे मूळ गाव. शेती व शेतमजुरीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या भगरे यांनी एम. ए. बीएडपर्यंत शिक्षण घेतले. पिंपळगाव बसवंतच्या कन्या शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सरपंच, पंचायत समितीत सभापती- उपसभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. लोकसहभागातून गावचा चेहरामोहरा बदलला. गावाला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय निर्मल ग्राम पुरस्कार व पर्यावरणरत्न पुरस्कार मिळाला. विभागीय स्तरावर तंटामुक्ती व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार त्यांनी मिळवून दिले. भगरे यांच्या पत्नी जिल्हा बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून भगरेंनी शाखाध्यक्ष, तालुकाध्यक्षपदावर काम केले. पक्ष दुभंगल्यानंतर दिंडोरी लोकसभेतील चारही आमदार अजित पवार गटात गेले. ते मात्र शरद पवारांबरोबर राहिले. दिंडोरीत शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. कांदा निर्यात बंदी, कृषिमालाबाबतचे धोरण, महागाई, बेरोजगारी हे सामान्यांचे प्रश्न प्रचारात भगरे मांडत होते. शरद पवारांनी दोन सभा घेतल्या. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तालुकास्तरापर्यंत लक्ष ठेवले. या सर्वांच्या पाठबळावर राष्ट्रवादी शरद पवार गटाने भाजपचा बालेकिल्ला हिसकावला आणि अजित पवार गटाच्या सर्व आमदारांच्या मतदारसंघात लक्षणीय मताधिक्य मिळवले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dindori lok sabha 2024 winning candidate of ncp sharad pawar teacher bhaskar bhagare in discussion css
Show comments