पंचवटीत मोर्चेकऱ्यांनी शेतमाल रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कांदा, कोथिंबीर तसेच इतर पिकांना योग्य भाव, वनजमिनीचा प्रश्न, जुनी पेन्शन योजना यासह विविध मागण्यांसाठी माकप, किसान सभा तसेच इतर समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी सोमवारी मुंबईच्या दिशेने कूच केले. दिंडोरीहून निघालेला हा मोर्चा रविवारी सायंकाळी पंचवटीतील म्हसरूळ परिसरात मुक्कामी थांबला होता. मोर्चा सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास म्हसरूळकडून दिंडोरी रोड, मुख्य बाजार समिती, निमाणी, काट्या मारूती चौकमार्गे मुंबई नाक्याच्या दिशेने पुढे सरकला.२३ मार्च रोजी हा मोर्चा मुंबईत धडकणार आहे.

हेही वाचा >>>जळगाव : बस-दुचाकी अपघातात तीन युवक जागीच ठार

माकपचे माजी आमदार जिवा पांडू गावित, अजित नवले, डाॅ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, तानाजी जायभावे हे मोर्चाचे नेतृत्व करीत आहेत. दिंडोरी ते मुंबईतील विधानभवन असा हा मोर्चा आहे. रविवारी दुपारी दोन वाजता दिंडोरीपासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात १० हजार जणांचा सहभाग असल्याचा दावा आयोजक करीत असले तरी पोलिसांच्या अंदाजानुसार ही संख्या सुमारे सहा हजार आहे. मोर्चा नाशिकमध्येच थांबविण्याच्या दृष्टीने गावित यांच्याशी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. परंतु, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळात मागण्यांबाबत निर्णय घेतल्याशिवाय मोर्चा थांबणार नसल्याचा निर्धार गावित यांनी व्यक्त केला. मोर्चाचा पहिला मुक्काम म्हसरूळ येथे झाला. मोर्चासोबत मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त आहे. यावेळी डॉ. कराड, माकपचे जिल्हा सचिव रमेश चौधरी, सावळीराम पवार, किसान सभेचे अशोक ढवळे, मोहन जाधव हेही उपस्थित होते.

उन्हाची तमा न बाळगता मोर्चात पुरुषांसह महिलांचाही सहभाग लक्षणीय आहे. माकपचे चिन्ह असलेले लाल झेंडे, किसान सभा लिहिलेल्या लाल रंगाच्या टोप्या परिधान केलेले शेतकरी, यामुळे रस्त्याने जणूकाही लाल वादळ पुढे सरकत असल्याचा भास होतो. मोर्चा निमाणी बस स्थानकाजवळ आला असतांना शेतमालाला भाव मिळत नसल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, वांगे रस्त्यावर टाकण्यात आले. मोर्चातीलच काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकलेला शेतमाल पिशव्यांमध्ये भरला.

असा असेल मुक्काम
रविवारी दुपारी दिंडोरीहून निघालेल्या मोर्चाचा पहिला मुक्काम पंचवटीतील आरोग्य विद्यापीठाजवळ झाला. सोमवारी हा मोर्चा इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीसमोरील मैदानात थांबणार आहे. यानंतर इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवीपुढे मुक्काम राहणआर आहे. कसारा घाट ओलांडल्यावर पुढील मुक्काम कुठे करायचा, त्याचे नियोजन सुरु आहे. २३ मार्च रोजी मुंबईत मोर्चा धडकेल. मोर्चेकऱ्यांनी सोबत शिदोरी घेतली असून मोर्चातील काही लोक पुढे जाऊन स्वयंपाकाची तयारी करतात.

हेही वाचा >>>जळगाव : तहसीलदार, नायब तहसीलदार वेतनवाढीसाठी सामूहिक रजेवर; तहसील कार्यालयांत कामकाज ठप्प

मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

जमीन कसणाऱ्यांच्या नावे करून सातबारावर नाव लावावे, अपात्र वनजमीन दावे निकाली काढून दावे पात्र करावेत, प्रत्येक मंजूर प्लॉट धारकाला विहीर, सौरऊर्जेवरील वीज पंप, पाईपलाईन, जमिनीचे सपाटीकरण, फळबाग, लागवड यासारख्या केंद्र सरकारने प्लॉट धारकांना जाहीर केलेल्या योजना राबवाव्यात, गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा, ज्या गायरान जमिनीवर घरे आहेत ती घरे नियमित करा, प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान एक लाख ४० हजारावरुन पाच लाख रुपये करावे, नार-पार, तापी-नर्मदा नदी जोड प्रकल्प रद्द करून सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर या तालुक्यातून पश्चिम वाहिन्या नद्यांवर सिमेंटचे बंधारे, पाझर तलाव, लघु पाटबंधारे यासारख्या योजना राबवाव्यात, कांदा, द्राक्ष आणि इतर शेती पिकांना हमीभाव मिळावा, लाल कांद्याला ६०० रुपये अनुदान जाहीर करावे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dindori mumbai march of farmers and laborers will strike at vidhan bhavan amy