लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांची पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट न दिल्याने पाटील यांनी अखेरच्या क्षणी मनसेत प्रवेश करून निवडणूक लढविली होती. तिसऱ्या क्रमांकाची मते त्यांनी मिळवली.
महापालिका निवडणुकीत पाटील यांच्या अनुभवाचा उपयोग करण्याचे नियोजन मनसेने केले आहे. कधीकाळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. शहरात तीन आमदार आणि महापालिकेत मनसेची सत्ता होती. परंतु, स्थानिक पातळीवरील कुरघोडीच्या राजकारणात पक्षाला लागलेली गळती अव्याहतपणे कायम राहिली. या घडामोडीत काही महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या दिनकर पाटील यांना सरचिटणीसपद बहाल करुन मनसेने नव्याने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
विधानसभा निवडणुकीत मनसेमध्ये गेलेले दिनकर पाटील हे पुन्हा भाजपमध्ये परततील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. या नियुक्तीने त्यास पूर्णविराम मिळाला आहे. मुंबई येथे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पाटील यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, अंकुश पवार उपस्थित होते.