लोकसत्ता वार्ताहर

धुळे: बनावट दारु निर्मिती आणि अवैध वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेला संशयित दिनेश गायकवाड उर्फ दिनू डॉन यास अखेर धुळे पोलिसांनी गंगाखेड (जि. परभणी) येथे अटक केली. ४ डिसेंबर २०२२ रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत बनावट दारुसह ९५ लाख ७७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तेव्हापासून दिनू डॉन फरार होता.

चार डिसेंबर २०२२ रोजीच्या कारवाईत धुळे तालुका पोलीस ठाण्यात १० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात दिनू डॉनचा समावेश होता. फरार दिनूला पकडण्यासाठी पोलिसांनी पथके नेमली होती. घटना घडल्यानंतर नेपाळ, गोवा, उत्तर प्रदेश आणि बिहार असा दिनूने आपला मुक्काम हलविला होता. दिनू परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील बस स्थानकाजवळ असलेल्या जगदंबा हॉटेल जवळ थांबला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक २९ जून रोजी तेथे पोहचले.

हेही वाचा… विभागीय कार्यालय धुळ्यात होण्यासाठी राजकीय नेत्यांनी पक्षभेद विसरावेत – ठाकरे गटाचे आवाहन

पोलिसांनी दिनू डॉन यास ताब्यात घेतले. दिनूवर धुळे जिल्ह्यात आणि इतर जिल्ह्यात, राज्यात गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी त्यांच्या तांत्रिक कौशल्याच्या आधारावर मिळालेल्या माहितीच्या आधारे केली. दिनूच्या शोधार्थ नेमण्यात आलेल्या पथकामध्ये उपनिरीक्षक अनिल महाजन, हवालदार प्रविण पाटील, पोलीस नाईक उमेश पवार, कुणाल पानपाटील यांचा समावेश होता. 

Story img Loader