लेझर शो बंद, सायकल मार्गिकेचे काम अपूर्ण

डोलणाऱ्या हत्तीची प्रतिकृती.. रंगबेरंगी फुलपाखरांच्या आकारातील बैठक व्यवस्था.. हसा खेळा, पण शिस्त पाळा असा संदेश देणारे फलक..  बच्चे कंपनीसाठी तयार करण्यात आलेला बगीचा.. शहराजवळील ‘बॉटेनिकल गार्डन’ची ही सर्व वैशिष्टय़े

सुटीनिमित्त लहानग्यांसह पालकांना खुणावत असताना या उद्यानाची बिकट अवस्था त्यांना निराश करीत आहे.

उद्यानाचे मुख्य आकर्षण असलेला लेझर शो तर कधीच बंद पडला आहे. दुसरीकडे, निसर्गाच्या सान्निध्यात लहानग्यांना घेऊन आलेल्या कुटुंबीयांना प्रेमीयुगुलांचा त्रास होत आहे. वन विकास महामंडळ, नाशिक महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने पांडवलेणीच्या पायथ्याशी दोन वर्षांपूवी ‘बॉटेनिकल गार्डन’ आकारास आले. त्या वेळी या ठिकाणी टाटा ट्रस्टच्या मदतीने सायकलवर भटकंतीसह खास ‘कथा अरण्याची’ हा लेझर शो सुरू करण्यात आला होता. वन विभागाकडे ट्रस्टकडून हा प्रकल्प हस्तांतरित झाल्यानंतर या प्रकल्पाच्या दुरवस्थेस सुरुवात झाली. अपुऱ्या मनुष्यबळावर वनविभाग उद्यानासह अन्य व्यवस्था पाहत आहे. दोन वर्षांत महापालिका तसेच वनविभागाकडून सायकल ट्रॅक बांधण्याचे काम पूर्ण होऊ न शकल्याने सायकलवर भटकंती अद्याप सुरू झालेली नाही.

वनौषधी उद्यानात वनविभागाच्या सहकार्याने वनसंपदेची माहिती देणाऱ्या दालनाची माहिती नसल्याने फारसे कोणी तिकडे फिरकत नाही. काही तांत्रिक अडचणींमुळे पाच महिन्यांपासून बंद झालेला ‘लेझर शो’ अद्याप सुरू झालेला नाही. यामुळे पर्यटकांना केवळ उद्यानाची भटकंती करावी लागत आहे. या ठिकाणी काही प्रेमीयुगुल आणि काही समाजकंटक येथे येऊन धुडगूस घालतात. सकाळी १० पासून त्यांचा वावर या ठिकाणी असल्याने बच्चेकंपनीला सोबत घेऊन आलेल्या पालकांना या ठिकाणी अवघडल्यासारखे होते. शहरातील अनेक उद्यानांच्या दुरवस्थेत ‘बॉटेनिकल गार्डन’च्या दुरवस्थेची भर पडली आहे.

याविषयी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नाममात्र शुल्क घेऊन ‘बॉटेनिकल गार्डन’मध्ये प्रवेश दिला जात असल्याचे सांगितले. वनविभागाकडे प्रकल्प आल्यापासून येथे नेमलेल्या ११ वनमजुरांवर येथील सर्व व्यवस्था तसेच सुरक्षेचा भार देण्यात आला आहे. तसेच बंद असलेला लेझर शो काही तांत्रिक बिघाड दूर करून आठ दिवसांत पुन्हा सुरू होईल, असे सांगितले.

Story img Loader