लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात मुलगा झाला असताना ताब्यात मुलगी दिल्याची तक्रार पालकांनी केल्यानंतर सखोल चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ११ जणांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

नांदुरनाका येथील रितिका पवार या जिल्हा रुग्णालयाच्या प्रसुती कक्षात दाखल झाल्या होत्या. प्रसुतीनंतर बाळाची नोंद पुरूष जातीचे अर्भक करण्यात आल्याचे पालकांचे म्हणणे आहे. बाळाला उपचारासाठी रुग्णालयातील बाळांसाठी असलेल्या कक्षात नेण्यात आले. त्यानंतरही बाळाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी नातेवाईक बाळाचे डायपर बदलत असताना बाळ मुलगा नसून मुलगी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात येऊन गोंधळ घातला. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात ठिय्या दिला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी या प्रकाराचे गांभीर्य ओळखून संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती नेमली. या समितीने बाळाच्या जन्माच्या वेळी करण्यात आलेल्या नोंदी तसेच सीसीटीव्ही चित्रणासह अन्य कागदपत्रे ताब्यात घेतली. बुधवारी रात्री उशीराने समितीचा अहवाल प्राप्त झाला.

आणखी वाचा-जिल्ह्यात तंबाखूमुक्त शाळांचे नऊ तालुके, सिन्नरचाही समावेश

समितीने पवार यांचे नातेवाईक, रुग्णालय कर्मचारी, अधिकारी यांच्याशी चर्चा केली. पवार यांच्या बाळावर उपचार करणारे अधिकारी व कर्मचारी यांनी परस्परविरोधी लेखी उत्तरे समितीसमोर नोंदवली. पवार यांचे खासगी आणि सरकारी रुग्णालयातील सोनोग्राफी अहवाल सारखे आहेत. शासकीय दस्तावेजात नोंदी घेताना कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रथमदर्शनी कसूर केल्याचा ठपका समितीने ठेवला आहे.

समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी प्रसुती विभागात कार्यरत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैशाली खिरारी, अधिपरिचारिका आरती पाडवी, भाग्यश्री येवलेकर, कक्षसेविका छाया निकम, अतिदक्षता विभागात कार्यरत स्मिता कसोटे, किरण पाटोळे, डॉ. सदक, डॉ. देवेंद्र वाम तसेच प्रशिक्षणार्थी डॉ. जयेश दाभाडे, डॉ. समृध्दी अहिरे, डॉ. सागर कन्नोर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली.

आणखी वाचा-नाशिक : काँग्रेस सेवादलातर्फे ५० चौकसभांचे आयोजन

जिल्हा शासकीय रुग्णालयातील अर्भक बदली प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. दोषींवर शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव आरोग्य सेवा उपसंचालकांना देण्यात आला आहे. बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिची तब्येत सुखरूप आहे. –डॉ. चारूदत्त शिंदे (जिल्हा शल्य चिकित्सक)

समितीची सूचना

जिल्हा रुग्णालयात १३ ऑक्टोबरपासून जन्म झालेल्या आणि नवजात शिशु अतिदक्षता कक्षात दाखल झालेल्या सर्व अर्भकांची तसेच महेश आणि रितिका या पवार दाम्पत्याची गुणसूत्र पडताळणी करण्यात यावी, अशी सूचना समितीने केली आहे.