लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: उन्हाची दाहकता वाढू लागल्याने जिल्ह्यात टंचाई जाणविण्यास सुरूवात झाली आहे. शहरात काही ठिकाणी कृत्रिम टंचाईवरुन आरोप-प्रत्यारोप होत असतांना ग्रामीण भागात पाणी नियोजनाचे कारण पुढे करुन वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. इगतपुरी तालुक्यातील चिंचलखैरे ग्रामपंचायतीतंर्गत असलेल्या खैरेवाडी येथील विहीरीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक स्वरुप धारण केल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी येथे चार ते पाच पाडे आहेत. गावात दोन विहीरी आहेत. एका विहीरीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असून गावाची तहान दुसरी विहीर भागवत आहे. विहिरीत साधारणत: पुढील दीड ते दोन महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. उन्हाची वाढती दाहकता आणि टंचाईचे संकट लक्षात घेता पुढील दिवसांमध्ये पाणी पुरणार नाही, असे कारण देत येथील विहीरीतून नळ योजनेला होणारा सौर उर्जा प्रकल्पावरील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. महिलांना हंड्याने पाणी आणा, असा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे तीन दिवसांपासून नळाला पाणी नाही. महिलांना तसेच गावातील मुलांना, युवकांना विहीरीवर जावून पाणी भरावे लागत आहे.

आणखी वाचा- अट्रावल दंगल प्रकरणी १७ संशयितांना पोलीस कोठडी ; २०५ संशयितांविरुद्ध गुन्हा

पाणी नियोजनाचे कारण पुढे करत वीज पुरवठा खंडित केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. पंचायत समितीवर बुधवारी हंडा मोर्चा काढण्याचा इशारा महिलांसह ग्रामस्थांनी दिला. याविषयी एल्गार सामाजिक संघटनेचे भगवान मधे यांनी माहिती दिली. आदिवासी भागात पाणी बचतीचा संदेश देण्यापेक्षा शहरी भागात याविषयी प्रबोधन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विहीरी तळ गाठत असल्याने याविषयी प्रस्ताव सादर करुन जिल्हा प्रशासनाकडे टँकरची मागणी करा, असे सूचवितानाच कुठलाही लेखी आदेश नसतांना वीज पुरवठा खंडित का करण्यात आला, असा प्रश्न मधे यांनी उपस्थित केला. याविषयी ग्रामसेवक मनोहर सुरवाडे यांनी पाण्याचे नियोजन करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता, असे सांगितले. लोकांच्या भावना लक्षात घेऊन मंगळवारी दुपारनंतर वीज पुरवठा सुरू करण्यात आला. आता पाणी किती दिवस पुरेल, त्याचे नियोजन लोकांच्या हातात असल्याचे नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disconnection of electricity supply for water planning in nashik mrj
Show comments